मालेवाडी, खामगांव येथील शेतक-यांच्या मदतीला पंकजाताई मुंडे धावल्या

0 182

प्रधानमंत्री विमा पोर्टलवर गांवे दिसत नसल्याने विमा भरण्यास अडचणी ; पर्यायी व्यवस्था करण्याची जिल्हाधिका-यांकडे केली मागणी

परळी – तालुक्यातील मालेवाडी, खामगांव यासह अन्य काही गांवे प्रधानमंत्री विमा पोर्टलवर दिसत नसल्याने शेतक-यांना विमा भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, शेतक-यांना होणा-या या त्रासाची तात्काळ दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिका-यांना थेट फोन करून विमा भरण्यापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी केली.

मालेवाडी व खामगांव ही गांवे पूर्वी अनुक्रमे अंबाजोगाई व धारूर तालुक्यात होती. प्रशासकीय व इतर कामे करताना प्रचंड गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना ही गांवे परळी तालुक्यात समाविष्ट करून घेतली. पीक विमा भरण्याची सध्या सर्वत्र धावपळ सुरू आहे. प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी या गावातील शेतक-यांना मात्र मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रधानमंत्री विमा पोर्टलवर या दोन्ही गावच्या जमिनीचे ऑनलाईन रेकाॅर्ड सध्या दिसत नाही, त्यामुळे शेतक-यांना विमा भरण्यास मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील दोन वर्षातही अशाच अडचणी आल्या होत्या. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने शेतक-यांची घालमेल अधिकच वाढली आहे.

प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची बाब दोन्ही गावातील शेतक-यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधून त्यांच्या कानावर घातली, त्यांनी याची तातडीने दखल घेत लगेच जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी संपर्क केला व चर्चा केली. प्रधानमंत्री विमा पोर्टलवर या दोन्ही गावचा समावेश करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली. जिल्हाधिका-यांनी देखील सकारात्मकता दाखवत लवकरच याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!