राज्यसभेतील 6 रिक्त जागेसाठी 4 ऑक्टोबरला निवडणूक, राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर कुणाला संधी?
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 22 सप्टेंबर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, तर ही निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त झाली होती.
म्यान, राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस कुणाला पाठवणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मागच्या वेळी काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची हुकलेली संधी परत मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याचाच विचार होणार अशी चर्चा सुरु आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे.
राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. तर, राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना संधी देणार का पाहावं लागणार आहे.
4 ऑक्टोबरला मतदान आणि निकालही
पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल. अर्ज मागे घेण्याची तारीख 27 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर, मतदान आणि निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगानं ही संपूर्ण प्रक्रिया 6 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असं देखील कळवलं आहे. याशिवाय बिहारमधील विधानपरिषद निवडणूक देखील याचवेळी पार पडणार आहे.