वाखारी नित्यानंद नगर पांदन रस्ता सुधारणा कामास प्रारंभ
सुनील (गोटू आबा) आहेर यांची आश्वासन पूर्तता
वासोळ, प्रशांत गिरासे – देवळा तालुक्यातील वाखारी येथील नित्यानंद नगर ते धनदाई माता मंदिर या ४ किलोमीटर पांदन रस्त्याचा शुभारंभ दिनांक ३ मार्च रोजी पत्रकार संजय देवरे, महेश सोनकुळे, जगदीश निकम यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर यांनी रस्ते कामास जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले व स्थानिक शेतकरी बांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमती शांता बाई पवार, सौ नूतन ताई आहेर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुनील आहेर म्हणाले की येथील शेतकरी बांधवांनी सदर रस्त्या अभावी शेतमालाचे होणारे आर्थिक नुकसान, पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी होणारी परवड व आजारी व्यक्तीस वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांची झालेली अत्यावस्था ही कैफियत मांडली हीच परिस्थिती इतरही गावात शेतकरी बांधवांची असल्याचे लक्षात आल्यानेच मी हे जेसीबी मशिन उपलब्ध करून देऊन लोकसहभागातून या रस्त्याचे काम सुरू होत आहे या रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ पत्रकार मित्रांच्या हस्ते करण्याचा हेतू हा की लोकसहभागातून पांदन रस्ता दुरुस्ती ही लोकचळवळ व्हावी शेतकरी बांधवांनी मध्ये जागृती निर्माण होऊन इतरही शेतकरी बांधव या विधायक कामात जोडले जावे हा आहे कारण पत्रकार बांधव हे आपल्या लेखणीतून समाजाला न्याय देण्याचे व जनतेच्या समस्या लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात परिसरातील इतरही गावातील शेतकरी बांधवांनी संघटित होऊन शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेण्यास महत्त्वपूर्ण असणाऱ्या पांदन रस्ते सुधारणेसाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विलास पवार, मुन्ना पवार, साहेबराव सोनजे, राकेश ठाकरे, योगेश पवार, दिगंबर ठाकरे, सुभाष पवार, गोटू चव्हाण, चंद्रकांत आहेर, सुनील मगर, नानाजी मगर, तुळशीराम मगर, पोपट पवार, जगन्नाथ पवार, किसन मगर, मधुकर जगदाळे, बाळू आहेर, भुरा पवार, खंडू पवार, संजय पवार आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कांद्याला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असताना नाल्यातून कांदा वाहतूक करणे शक्य न झाल्याने चाळीतील कांदा वेळेवर बाजारात नेता आला नाही परिणामी आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले सुनील गोटूआबा आहेर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून रस्ता दुरुस्ती हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
-साहेबराव सोनजे, स्थानिक शेतकरी