सरपंच, उपसरपंचासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0 143

– भीसी येथील कामातील अनियमितता फेरचैकशीचे प्रकरण
– चंद्रपूर एसीबीची कारवाई
चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भिसीच्या सरपंच, उपसरपंचासह विस्तार अधिकारी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारला दुपारी चिमुरात केली. या कारवाईने चिमुरात एकाच खळबळ उडाली आहे.

◆ योगिता गोहणे (३५), लीलाधर बनसोड (४५) हेमंत हुमने (४४) असे लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. योगिता गोहणे या भीसी ग्रामपंचायतच्या सरपंच तर लीलाधर बनसोड हे उपसरपंच आहेत. हुमने हे चिमूर पंचायत समितीला विस्तार अधिकारी आहेत. विशेष म्हणजे तक्रारदार हे भीसी ग्रामसचिवालायचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शासकीय कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले होते. एका प्रकरणाची फेर चौकशी होणार असल्याने त्या प्रकरणासह अन्य काही प्रकरण तडजोडीने मिटविण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि विस्तार अधिकारी या तिघांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे बोलले जात आहे. तडजोडीअंती २० हजार देण्याचे कबूल झाले.
◆ मात्र, लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी याची तक्रार चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. तक्रारीवरून विस्तार अधिकारी हुमने यांच्या वडाळा येथील घरी एसीबीच्या पथकाने सापळा रचून तिघांनाही लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!