बदलापूरातील आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन रद्द करण्याची वामन म्हात्रे यांची मागणी

0 107

बदलापूर,दि 10 (प्रतिनिधी)ः
बदलापूरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही बदलापुरात लॉकडाऊनचा गोंधळ सुरूच आहे. गरज नसताना कुणाच्या तरी दबावाखाली घाईघाईने जनतेवर हा लॉकडाऊन लादण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. हा लॉकडाऊन रद्द करण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल,असा इशाराही त्यांनी दिला.
शनिवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान वामन म्हात्रे यांनी कडक लॉकडाऊनच्या आदेशातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले. सध्या शहरात राज्य शासनाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या काळात शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू दर मुंबई महानगर क्षेत्रातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे हा कडक लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मेडिकल,दवाखाने,बँक वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दूध,भाजीपाला, किराणा आणि इतर गोष्टी घरपोच देण्याची परवानगी आहे. मात्र शहरात अशी सुविधा देणारे किती विक्रेते आहेत,त्यांची यादी, मोबाईल नंबर वा वेबसाईटची माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील हजारो नागरिक दररोज मुंबई वा अन्य शहरात नोकरीसाठी जात असतात. त्यांना ये-जा करण्यासाठी रिक्षाची गरज असते. परंतु रिक्षा सेवा सुरू राहणार की नाही? याबाबत आदेशात काहीही नमूद करण्यात आलेले नाही. शहरात ५००-१००० रुपये कमावणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये व्यवसाय सुरू ठेवून जीवनचक्र चालवण्याची संधी उपलब्ध करून दिली, ही संधी कडक लॉकडाऊनच्या नावाखाली पुन्हा हिरावून घेतली जात आहे. त्यांना १०-२० रुपयांच्या पदार्थांसाठी घरपोच सेवा देणे शक्य आहे का? लॉकडाऊनमध्ये गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा म्हणून रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या कडक लॉकडाऊन काळात धान्य कसे मिळवावे? बदलापूर शहरात जवळच्या ग्रामीण भागातील आदिवासी, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बदलापूरात येत असतात.मात्र कडक लॉकडाऊनमुळे या लोकांना शहराचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यांनी एक दिवसात घरपोच वितरण व्यवस्था कशी उभारायची? असे अनेक प्रश्न वामन म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. कोरोना काळात नागरिकांना सकस आहाराची गरज असते त्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन करताना मांसमासळी विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र कडक लॉकडाउनच्या आदेशात याबाबत नमूद करण्यात आलेले नाही. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे लग्नासाठी किती लोकांना परवानगी असेल? याबाबतही या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही,याकडेही वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे घाईगडबडीत कुणाच्या तरी दबावाखाली कडक लॉकडाऊनचे आदेश काढले असून त्याला शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी हरकत असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!