पुन्हा राजकारण तापणार..उद्योगपती गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट

0 136

विरोधकांच्या निशाण्यावर असणारे वादग्रस्त उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सिल्व्हर ओकवर दोन तास चर्चा झाली. या भेटीने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे यात काहीही शंका नाही. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली.

गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. तसंच जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणात योग्य असेल असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट सूचक आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.

गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यासाठी त्यांनी कारणही दिलं आहे. एवढंच नाही तर देशात इतर प्रश्नही अदाणी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच JPC म्हणजेच संयुक्त संसदीय समितीच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडली होती. या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी आपण आपलं मत मांडलं असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांना जेपीसी हवी असेल तर माझी ना नाही असंही म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता आज गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून आता या भेटीवरून विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.

हिंडेनबर्गचा पहिला आरोप

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी कंपनीबाबत 3 मोठे आरोप केलेत. त्यात पहिल्या आरोपात म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत त्याच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत 85% जास्त आहे. वास्तविक, शेअरची किंमत त्या कंपनीने केलेल्या नफ्यावरून ठरवली जाते. कंपनीच्या नफ्याच्या तुलनेत कंपनीच्या शेअरची किंमत किती असेल याचा अंदाज बाजार लावतो. याला प्राइस अर्निंग रेशो म्हणतात. अदानीच्या कंपन्यांचे प्राइस अर्निंग रेशो इतर कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

हिंडेनबर्गचा दुसरा आरोप

हिंडेनबर्गने आपल्या अहवालातील दुसऱ्या आरोपात म्हटले आहे की, अदानी समूहाने शेअर बाजारात हेराफेरी करून आपल्या समभागांची किंमत वाढवली आहे. अदानी यांनी मॉरिशस आणि इतर देशांतील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले. त्या कंपन्यांनी नंतर अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. अशा प्रकारे परदेशी कंपनीने शेअर्स खरेदी केल्याने अदानींच्या कंपनीवर लोकांचा विश्वास वाढतो. यामुळे शेअरची मागणी वाढते आणि मागणी वाढली की शेअरची किंमतही वाढते. अदानी यांचा भाऊ विनोद दुबईत बसून हेच काम करत असल्याचे हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालात विनोद अदानी यांच्याशी संबंधित 38 कंपन्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हिंडेनबर्गचा तिसरा आरोप

हिंडेनबर्ग अहवालातील तिसऱ्या आरोपात म्हटले आहे की, अदानी समूहावर 2.20 लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. कंपन्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांनी आपले शेअर्स तारण ठेवून कर्ज घेतले आहे. अदानी यांनी यापूर्वी एसीसी आणि अंबुजा कंपनी खरेदी करण्यासाठीही कर्ज घेतले होते. अशा स्थितीत बँकांकडे अदानींच्या शेअर्सशिवाय वसुली करण्यासाठी काहीही नाही.

अदाणींचे उत्तर काय?

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाने मोठे नुकसान लक्षात घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. 26 जानेवारी रोजी अदानी समूहाने एक निवेदन जारी करून हिंडनबर्ग अहवाल चुकीची माहिती आणि तथ्यांच्या आधारे तयार करण्यात आल्याचे म्हटले. हा जारी झाल्यानंतर आमचे भागधारक आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

error: Content is protected !!