मराठा आरक्षणासाठी पत्र लिहीत एकाची आत्महत्या..वाचा पत्र..

0 231

राज्य सरकारला देण्यात आलेली मराठा आरक्षणाची डेडलाईन संपत आलेली असतानाच मराठा आरक्षणासाठी एका व्यक्तीने स्वत:ला संपवलं. सुनील कावळे (वय 45) असं या व्यक्तीचं नाव आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काल रात्री त्यांना जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात आरक्षणाविषयीची तगमग आणि तळमळ व्यक्त केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.

कोण होते सुनील कावळे? 

सुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे. जालना (Sunil Kawale Jalna) जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छ. संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.

मराठा आरक्षणासाठी निस्वार्थी कार्यकर्ता त्यांना दिसला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटील यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, हा माणूस आपल्याला आरक्षण देऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. पण मनोज जरांगे आणि त्यांची भेटच झाली नाही. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याभोवती मीडियाचा गराडा आहे. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.

सुनील कावळेंनी मनोज जरांगेंना पत्र लिहिली आहे.  सुनील कावळेंचं मृत्यूपूर्व पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षण, मगच इलेक्शन असा इशारा सुसाईड नोटमधून देण्यात आला आहेय.  या पत्रात त्यांनी 24 ऑक्टोबरला त्यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच पत्राच्या शेवटी माफी देखील मागितली आहे

महाराष्ट्राचं कुलदैवत  तुळजाभवानी माता  हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराज  यांना मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी

मी सुनील बाबूराव कावळे, 
मु. पो. चिकणगाव, 
तालुका अंबड, जिल्हा जालना 

एकच मिशन, मराठा आरक्षण,  एक मराठा लाख मराठा… साहेब आता कोण्या  नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर 24 हा मराठा
आरक्षण दिवस, या मुंबईमध्येच… आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं नाव तोंडातून काढू नका 
आता फक्त आणि फक्त  मराठा आरक्षणासाठी या  मुंबईमध्ये उपोषणाला बसू. ऊठ मराठा जागा हो…  पण लक्षात ठेवा, शांततेत  यायचंय… शेतकऱ्यांच्या  मुला-मुलींच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील,  पण आता एकच मिशन मराठा आरक्षण संत, महंत आणि  कीर्तनकारांनी कीर्तनातून  मराठा आरक्षण समजावलं. 

आपण चार पाच दिवस उपोषण केलं, तर कुणी मरत नाही… कोरोनाचं संकट आलंच होतं ना? दोन महिने घरात  बसलेच होते ना? काय झालं? चारपाच दिवस शाळेत गेलं नाही, तरीही काहीही फरक पडत नाही. लढा गरजवंतांचा, लढा निष्ठावंतांचा  लढा शौर्यवंतांचा बहुसंख्य असूनही शांततेच्या  मार्गाने चालणाऱ्या मराठ्यांचं आता एकच मिशन…. आधी मराठा आरक्षण…  मगच इलेक्शन  मला वाटलं, मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो. 
सर्वांनी मला माफ करावं.

50 लाख आणि सरकारी नोकरी द्या : मनोज जरांगे

दरम्यान, कावळे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखाची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी,अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

 

error: Content is protected !!