महाविकास आघाडीत  जाण्याचा विचार नाही-राजू शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0 29

: महाविकास आघाडीत  जाण्याचा विचार नाही, उद्धव ठाकरेंच्या  भेटीनंतर राजू शेट्टींकडून  स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे. तसेच, महाविकास आघाडीशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, अदानींविरुद्धच्या लढाईत आम्हाला ठाकरे गटाची साथ हवी आहे, त्यामुळे आज ठाकरेंची भेट घेतली आहे, असंही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीला सहा जागांवर उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा मतदारसंघातून स्वाभिमानी उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं. राजू शेट्टी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.

आज मी उद्धव ठाकरे यांना भेटलो ते राजकीय हेतूनं भेटलेलो नाही. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भेटलो होतो. ठाकरे यांची अदानी उद्योगसमुहाच्या विरोधात लढाई सुरु आहे. अदानींचा आम्हा शेतकऱ्यांना देखील त्रास होत आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.केंद्रानं अदानींच्या प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळं सोयाबीनला भाव नाही. २००० साली असणारा सोयाबीनचा भाव चार हजार रुपये आणि २४ वर्षानंतर आहे तेवढाच टिकून आहे, याचं कारण मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल बाहेरच्या देशातून आयात झालं. त्याच्यावरील आयात शुल्क २०२५ पर्यंत कमी केलं आहे, त्यामुळं सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

येत्या १५ जानेवारीपासून सोयाबीन आणि कर्जमाफीच्या मुद्यावर मराठवाड्यात दौरा सुरु करणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची अदानीविरुद्धची लढाई आहे ती शेतकऱ्यांची देखील लढाई आहे. कारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. कोल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव येथील धरणाचं पाणी आहे, त्या धरणाचं पाणी अदानी उद्योगसमूह ८४०० कोटी खर्च करुन सिंधुदुर्गला नेऊन २१०० मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे. त्यामुळं कोल्हापूर आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. याविरोधात आम्ही लढा लढणार आहोत. यासाठी आम्ही संघर्ष समिती उभी करणार आहे. यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांचा लढा उभा करणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या लढ्यात पाठिंबा देऊ असं राजू शेट्टी म्हणाले. शहरासह गाव खेड्यातील लोकांनी एकत्र येत या प्रश्नावर लढायचं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.महाविकास आघाडीत जायचा विचार आमचा नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. आम्ही जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करतोय, त्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा आहे, त्यासाठी ठाकरेंना भेटलो, असं राजू शेट्टी म्हणाले. मविआनं एफआरपी आणि भूमिअधिग्रहण कायद्यातील बदल या मुद्यावर आम्ही मविआ सोडली आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावेळी मविआतील नेते कारखानदारांच्या बाजूनं झुकतात, असं राजू शेट्टी म्हणाले.

error: Content is protected !!