सांगोलाच्या दुधाळ जनावरांच्या बाजाराला सेलूच्या बळीराजा संघर्ष समितीची भेट
सेलू ( नारायण पाटील)
बळीराजा संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून सेलू तालुक्यात शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय, जोडधंद्यासाठी जनजागृती करीत आहोत. पहिल्या टप्प्यात दुधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्या अनुषंगाने मेळावा, प्रबोधन बैठका, मार्गदर्शन शिबिर यांतून जनजागृती केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून दुधाळ जनावरं बघता यावी, पशु पालकांकडून गायी म्हशींची माहिती व्हावी म्हणून आज सांगोला (सोलापूर) जनावरांच्या बाजारात गेलो होतो.
एच् एफ आणि जर्शी जातीच्या किमान दोन ते अडीच हजार गायी बाजारात होत्या आणि तेवढ्याच वेगवेगळ्या जातीच्या म्हशी होत्या,बैल होते, शेळ्या, कोंबड्या ही मोठ्या प्रमाणावर या बाजारात होत्या.
‘साधारणत: पंचेचाळीस वर्षांपूर्वी कै. शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यांच्या कारखान्यावर पाच एच् एफ आणि जर्शी गायी आणल्या. अगोदर स्वत: या व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर गावोगावच्या शेतकऱ्यांना या गायी पहाण्यासाठी कारखान्यावर बोलावलं, त्यांची माहीती दिली. पुढं गावोगाव मेळावे घेऊन दुधाच्या धंद्याचे महत्त्व सांगितले, पुढे त्यांनी शेतकर्यांना आवश्यकतेनुसार गायी उपलब्ध करून दिल्या. गोठा,खाद्य, मेडीसीन, दुध, मार्केट,बॅंक, जोखीम याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. नव्हे त्या चळवळीचं नेतृत्व केलं.पश्चिम महाराष्ट्र सधन व्हायला ‘धवल क्रांती’ हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असल्याचं इंदापूरचे बुजूर्ग शेतकरी तथा पशुपालक शशिकांतजी चांगण यांनी सांगितले.
सांगोल्याच्या या ऐतिहासिक बाजारातून आज पशुपालक शेतकरी शशिकांतजी चांगण यांच्याकडून, दोन एच्.एफ. गायी तर भिमराव पाटील यांच्याकडून जातवान जर्शी गायींच्या लागलेल्या दोन कालवडी विकत घेतल्या. ही चारही जनावरं पशुपालकांच्या गोठ्यावर होती. त्या गायी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात गायी जात असल्याच्या खुशीत त्यांनी आम्हाला फेटे बांधून,गुलाल उधळून आमचा सन्मान केला आणि फटाक्या फोडून आनंद व्यक्त केला..! या बाजारात अनेक पशुपालक शेतकर्यांच्या ओळखी झाल्या.कैकजनांशी मैत्री झाली.
कैकांनी गोठ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं. जातवान गायी पुरवण्याची हमी दिली..!
आज सांगोल्याच्या बाजाराला पशुपालनाचे अभ्यासक शेतकरी आणि माझे भाच्चे बाबा आंधळे, अशोक उफाडे आणि महादू थोरात सोबत होते.