मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-दोन याद्या का ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळावण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी महिला तहसील कार्यालयांत गर्दी करत आहेत. दरम्यान, या योजनेतून येत्या 15 ऑगस्टला पात्र महिलांना पहिला हफ्ता दिला जाणार आहे. मात्र त्याआधी एखादी महिला पात्र की अपात्र हे कसे ठरवले जाणार? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे? सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या दोन याद्यांचा नेमका अर्थ काय आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे.
तात्पुरत्या यादीचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. महिलांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर एकूण दोन याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तशी माहिती 28 जून रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. या माहितीनुसार महिलांचे अर्ज मिळाल्यानंतर शासनाकडून अर्जदार महिलांची एक तात्पुरती यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी पोर्टल, अॅपवर जाहीर केली जाईल. या तात्पुरत्या यादीची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत आणि वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावरही लावण्यात येईल.
तात्पुरत्या यादीवर घेता येणार हरकत
त्यानंतर या तात्पुरत्या यादीवर काही हककत असेल तर ती पोर्टल किंवा अॅपद्वारे करता येईल. याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार करता येईल. ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारी एका रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील.
तक्रार निवारणासाठी वेगळी समिती
पात्र लाभार्थी महिलांची यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत, तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. नोंदवण्यात आलेल्या हरकतींचे निवारण करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल.
दुसरी अंतिम यादी जाहीर केली जाणार
आलेल्या सर्व हरकतींचे तक्रार निवारण समितीकडून निराकरण करण्यात येईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची स्वंतत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्रावर तसेच पोर्टल आणि अॅपवरही जाहीर केली जाईल. अंतीम यादीत पात्र विभागात नाव असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.