पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला सेलूचा जगदंबा नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू
दि ४ ऑक्टोबर पासून देविभागवत कथेस प्रारंभ
सेलू / नारायण पाटील – येथील शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शेरे गल्ली मधील जगदंबा देवी नवरात्र महोत्सवास आज ३ ऑक्टोबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला .गणेश वसंतराव शेरे यांच्या हस्ते सपत्नीक आज देवीचे विधिवत पूजन व घटस्थापना करण्यात आली .यावेळी बालाजी देऊळगावकर यांनी पौरोहित्य केले .
या नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दररोज सकाळ संध्याकाळ देवीची महाआरती ,महिला मंडळ व पुरुष भजनी मंडळाचे भजन,हरिपाठ,हनुमान चालीसा पठण, भारुड आदी कार्यक्रम होणार आहेत .
दि ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ अशा अमोघ वाणीतून दुपारी १२ ते ४ या वेळेत देविभागवत कथेचे निरूपण होणार आहे .
दि १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवीला महाअभिषेक व आरती होणार आहे .तसेच दुपारी ११ ते १ यावेळेत कीर्तन केसरी ह भ प जयराम महाराज तांगडे यांचे काल्याचे कीर्तन व १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .सायंकाळी साडेसात वाजता देवीची भव्य पालखी( छबिना) मिरवणूक निघणार आहे .यावेळी पारंपरिक वेषेत महिला व पुरुष सहभागी होणार आहेत .तसेच कवड्याच्या माळा व हातात पोत घेऊन आराधी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत .बँड पथक व फटाक्यांच्या अतिष बाजीत ही पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्ताने परत देवी मंदिरात येणार आहे .
अंदाजे ५०० वर्षांपूर्वी सेलूत सुभेदार जे शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब नांवाने ओळखले जातात यांची गढी होती .त्या गढीच्या मातीत जगदंबा देवीची मूर्ती सापडली .त्यावेळी शेरे परिवाराने या मूर्तीची स्थापना केली .व तेव्हां पासून मातृभक्त असलेला शेरे परिवार हा उत्सव साजरा करतो .शेरे परिवाराचे हे कुलदैवत व श्रद्धास्थान असून सर्वजण या उत्साहात तन, मन व धनाने सहभागी होतात .हा उत्सव म्हणजे शेरे परिवाराची एक प्रकारे दिवाळीच असते .कारण लग्न झालेल्या लेकीबाळी देखील यावेळी आवर्जून येऊन उत्साहात सहभागी होतात .
पूर्वी पासून चालत आलेला हा पारंपरिक नवरात्र महोत्सवात आता नवीन पिढीने सहभाग घेऊन आमूलाग्र असा बदल केला आहे .त्यामुळे हा उत्सव गल्लीपुरता न राहता शहरातील सर्वांचाच झाला आहे . शहरातील असंख्य महिला नऊ दिवस येथे आवर्जून दर्शनासाठी येतात.त्यामुळे या परिसराला नऊ दिवस अक्षरशः जत्रेचे स्वरूप येते .
मंदिर चे अध्यक्ष संपत वामनराव शेरे यांच्या सह बबनराव शेरे ,महादू शेरे ,विष्णुपंत शेरे ,अविनाश शेरे ,छगन शेरे ,बापूसाहेब शेरे ,सचिन शेरे ,राजू शेरे ,सोपान शेरे ,संतोष शेरे ,बाबुराव शेरे ,उद्धव शेरे ,देविदास शेरे व शेरे परिवतातील सर्व तरुण वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात व नियोजनबद्ध साजरा करण्यासाठी प्रयत्न करतात