‘त्या’ लोकोपयोगी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आ.डॉ.गुट्टेंची थेट दिल्लीवारी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तब्बल १ हजार ४०५ कोटींसाठी साकडं
परभणी,दि 12 (प्रतिनिधी) :-
विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित आणि लोकोपयोगी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे थेट दिल्लीस पोहोचले आहेत. तिथे त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मंजूर कामांना निधीसह अंतिम मंजुरी द्या, अशी मागणी करीत तब्बल १ हजार ४०५ कोटींसाठी साकडे घातले. त्यावर मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘त्या’ लोकोपयोगी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आ.डॉ.गुट्टेंची थेट दिल्लीवारी केल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्या मागण्यांमध्ये गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपूलसह भुयारी मार्ग, शहर बाह्यवळण रस्ता, गंगाखेड-पालम ते लोहा, इसाद- पिंपळदरी फाटा- सुप्पा- पिंपळदरी ते किनगाव राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ७५२ गोदावरी नदीवरील पूल अशा काही मागण्यांचा त्यात समावेश आहे. त्यातील सर्व विकास कामांना मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच अंतिम मान्यता दिली आहे. केवळ निधी उपलब्धता बाकी आहे. त्यात काही रस्त्यांचे डांबरीकरण तसेच पूल मोऱ्यासह सुधारणा करणे यास मंजुरी देणे, अशी नव्याने मागणी करणारे पत्र सुध्दा आ.डॉ.गुट्टे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना भेटीवेळी सुपूर्द केले.
मंत्री महोदय गडकरी साहेब म्हणजे अफलातून माणूस. आपुलकी व स्नेहाचा झरा. समजून घेणारा व समजावून सांगणारा नेता याची प्रचिती प्रत्येक भेटीत येते. तीच आजही आली. त्यामुळे गंगाखेड विधानसभेच्या विकास कामांना निधीसह अंतिम मंजुरी देवून ते मोलाची मदत करतील, असा मला विश्वास आहे, असे आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर उपस्थित होते.