‘आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय’ भाजपचा जल्लोष

0 208

सिंधुदुर्ग: राणे कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं असून एकूण 19 जागांपैकी भाजपने 11 जागा खिशात घातल्या आहेत. तर दुसरीकडे एकूण आठ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवता आलाय. ही निवडणूक काही जागांवर अतिशय अटितटीची झाली. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली आहे. तसेच कोणत्या उमेदवाराने कोणाला धूळ चारलीय, जाणून घ्या संपूर्ण निकाल…जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे. आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तेली पराभूत

या निवडणुकीत भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांचा सुशांत नाईक यांनी पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

खणखणीत नाणे, नारायण राणे

भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर काही जणांनी नितेश राणेंचे फोटोही व्हायरल केले आहे. या फोटोवर गाडलाच असं लिहिलं आहे.

गाडलाच… नितेश यांची पहिली प्रतिक्रिया

नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना ते सापडून आलेले नाहीत. मात्र, आज त्यांनी एक फेसबूक पोस्ट करून विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर गाडलाच असं लिहिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

error: Content is protected !!