छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी…..खासदारांची टिका

0 57

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीली स्फोटक मुलाखत दिली. यात छगन भुजबळ यांनी शरद पवार, राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठमोठे दावे केलेत. तसंच महाविकास आघाडीवरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला काहीही महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं. ईडीपासून संरक्षण हवं होतं. म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत. मात्र फाईल कधीही बंद होत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊत काय म्हणाले?

“छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महाराष्ट्रात २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापन होण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा भुजबळ तुरुंगातून नुकतेच सुटून आले होते. भुजबळांना तेव्हा काय घडलं ते माहित नव्हतं. भाजपाला बाजूला सारुन सरकार झालं पाहिजे ही भूमिका होती. मी त्या प्रक्रियेत होतो मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. छगन भुजबळ हे आता काय म्हणत आहेत त्याला महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं, त्यांना ईडीपासून संरक्षण हवं होतं ते सगळं त्यांनी भाजपाबरोबर जाऊन घेतलं आहे. पण भुजबळांना सांगू इच्छितो फाईल कधीही बंद होत नाहीत. २०२४ ला नव्या प्रोटेक्शनसाठी भुजबळ कोणत्या पक्षात असतील ते बघावं लागेल.” असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांचे दावे खोडले आहेत.

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं होतं?

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तयार होण्याआधी भाजपाबरोबर जायचं हे शरद पवारांनी ठरवलं होतं मात्र ऐनवेळेस त्यांनी माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन ते सांगून आले की मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हाही भाजपासह जायचं या चर्चा झाल्या होत्या. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही मोदींना शब्द दिला होता की आपण सरकार स्थापन करु. या सगळ्या गोष्टींचा शब्द अजित पवारांनी पाळला पण शरद पवारांनी फिरवला. त्यामुळेच पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं, असंही भुजबळ म्हणाले होते. संजय राऊत यांनी छगन भुजबळांचा हा दावा खोडून काढला आहे.

सुप्रिया सुळे यांनी भुजबळांविषयी काय म्हटलं?

सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे दावे खोडून काढले आहेत. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै २०२३ ला झालेला अजित पवारांचा शपथविधी याविषयी शरद पवारांना अंधारात ठेवण्यात आलं होतं असं स्वतः भुजबळ यांनीच मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याला काय अर्थ आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

error: Content is protected !!