बालकांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद,सारसचा अभिनव उपक्रम
सेलू( नारायण पाटील )
– येथून जवळच असलेल्या हदगाव पावडे येथील छोट्या तलावावर सेलू व हदगाव येथील बालगोपाल शालेय विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण करत तलावावर बागडणाऱ्या पक्ष्यांचा आनंद घेतला.
हदगाव तलावावर पाणपक्ष्यांची जत्रा या अनुषंगाने मागील महिन्यात अनेक वर्तमानपत्रातून वृत्त प्रकाशित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने हदगाव पावडे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण जनजागृती शिबिराचे गुरुवार रोजी (दि. २७ एप्रिल) आयोजन केले होते. यावेळी हदगाव पावडे येथील पालक भगवान पावडे,मारोती पावडे,भागवत पावडे, ओमकार बोराडे, चंदर काळे, हदगाव प्रा.शा.येथील पदवीधर शिक्षक रामराव बोबडे सर,गिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शरद ठाकर, माधव गव्हाणे, नूतन विद्यालयाची आर्या विजय ढाकणे, अनया विजय ढाकणे, सौ अश्विनी ढाकणे आदी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नदी सुरय, राखी बगळा, वारकरी, छोटी अडई, सामान्य खंड्या, पांढऱ्या छातीचा खंड्या, हळदी कुंकू, पांढरा बगळा, टीबुकली, जांभळी पानकोंबडी, छोटा पाणकावळा आदी पक्ष्यांचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करता आले. एखाद दुसरा चुकून नजरेस पडणारे नदी सुरय व पांढरे बगळे मात्र आज पन्नास ते साठच्या संख्येने आढळून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दुर्बिणीद्वारे पक्षी निरीक्षण केले तर विजय ढाकणे यांनी विविध पक्ष्यांची माहिती विद्यार्थी व इतरांना दिली.
सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या असून विविध उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण करण्याचा छंद सुध्दा मुलांनी जोपासायला हवा. त्यातून मुलांची निरीक्षण क्षमता वाढून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. “सारस” च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षणाचे उपक्रम उन्हाळाभर राबविण्यात येतील. पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांनी संपर्क करावा असे आवाहन सारस टीम चे अध्यक्ष विजय ढाकणे यांनी केले.
आज प्रथमच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये हवी तेवढी जागरूकता नसल्याने आज संख्या कमी असली तरी येणाऱ्या काळात विद्यार्थी मोठ्या संख्येने पक्षी निरीक्षणाकडे वळतील असा विश्वास आहे असे मत सारस टीम चे सदस्य माधव गव्हाणे यांनी व्यक्त केले.