ठरलं…. कुठल्याही परिस्थितीत संतोष बांगरांना अस्मान दाखवायचं, उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!
मुंबई : ज्या संतोष बांगरांच्या निष्ठेचं कौतुक झालं, त्याच संतोष बांगराच्या दलबदलूपणाचीही राज्यात चर्चा झाली. २४ तासांआधी ठाकरेंसाठी अश्रू ढाळणाऱ्या संतोष बांगरांनी ऐनवेळी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करुन राजकारणात विश्वास वगैरे काही नसतो, हे महिनाभरापूर्वी दाखवून दिलं. बांगरांचा शिंदे गटातला प्रवेश ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. काहीही करुन बांगरांना अस्मान दाखवायचंच, असा निर्धारच ठाकरेंनी केला होता. आज त्याच दिशेने पहिलं पाऊल पडलं आहे.
मागील निवडणुकीतील बांगर यांचे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संतोष टारफे आणि अजित मगर यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष टारफे तर वंचित बहुजन आघाडी कडून अजित मगर हे रिंगणात होते. या निवडणुकीत संतोष बांगर यांचा विजय झाला होता. मगर हे दुसऱ्या स्थानावर तर टारफे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसमधील गटबाजीमुळे टारफे मागील काही दिवसापासून नाराज होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडूनही डावललं जात असल्यास आरोप टारफे यांनी केला होता. तर मगर देखील नाराज होते. आज दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मगर आणि टारफे या दोघांच्याही शिवसेनेत येण्याने संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तत्पूर्वी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही महिनाभराआधी शिवसेनेत प्रवेश केल्याने हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेतल्याने हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. आता हिंगोलीतून ठाकरेंचं वर्चस्व संपून शिंदे गटाची ताकद वाढल्याचं काही दिवस चित्र होतं. पण उद्धव ठाकरेंनी योग्य संधी साधून आज मोठा मास्टरस्ट्रोक मारलाय. बांगरांचे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेत घेऊन त्यांना कुठल्याही स्थितीत अस्मान दाखविण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.