डिजिटल साक्षरता ही काळाची गरज- कॉ. राजन क्षीरसागर
सेलू, प्रतिनिधी – तंत्रज्ञानाचा वाढता वापर, ऑनलाइन आर्थिक व्यवहार व वापरकर्त्यांचे अपुरे ज्ञान याचा फायदा घेऊन संधीसाधू आर्थिक फसवणुक करत असून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे डिजिटल साक्षरता ही आज काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांनी केले. ते नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात डिजिटल साक्षरता या विषयावर बोलत होते.
महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.राजाराम झोडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केशवराव डोईफोडे, नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, संतोष डोईफोडे, कार्यक्रमाधिकारी डॉ.अर्चना पत्की, डॉ. सुषमा सोमानी,प्रा.अजय उंडेगावकर यांची उपस्थिती होती.
आज माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून अन्न, वस्त्र व निवाऱ्याबरोबरच मोबाईल डेटा ही अनेकांची प्राथमिक गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे आपली वैयक्तिक माहिती चोरणे, फसव्या जाहिराती, संदेश, ओटीपी इत्यादीच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपण डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. ऑनलाइन फसव्या जाहिराती, अनोळखी ॲप्स, सॉफ्टवेअर यांपासून सावध राहिले पाहिजे. तसेच अभ्यासक्रमातही डिजिटल साक्षरतेसंबंधी घटकांचा अंतर्भाव होणे गरजेचे असल्याचे मत कॉ. राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.राजाराम झोडगे यांनी तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात झालेले बदल विशद करून कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो यावर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम अवलंबून असतात असे प्रतिपादन केले. आज इंटरनेटवरील ऑनलाइन गेम्स, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या अतिआहारी जाऊन आपले आरोग्य बिघडवलेल्या तरुणांची अनेक उदाहरणे जशी दिसतात तशीच यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळवून अभ्यास करणारे; फेसबुक, व्हाट्सअप इ. माध्यमातून आपला व्यवसाय वाढवणाऱ्या अनेकांची उदाहरणं आपल्याला दिसतील. त्यामुळे बदलत्या काळाची पावलं ओळखून नवीन तंत्रज्ञान, माहिती अवगत करा आणि आकर्षक पण फसव्या महाजालापासून स्वतःला दूर ठेवण्याचे आवाहन डॉ. राजाराम झोडगे यांनी केले.
यावेळी भागवत डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ माणिक सवंडकर यांनी केले. सूत्रसंचालन कु.नम्रता डासाळकर तर आभार प्रदर्शन कु.वैष्णवी जोशी यांनी केले.