सेलूतील करवा खून प्रकरणात चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

0 13
परभणी/प्रतिनिधी
सेलू येथील गाजलेल्या सुरेश करवा खून प्रकरणातील चार प्रमुख आरोपींना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल प्रथम जिल्हा न्यायाधीश श्रीमती नायर यांनी आज शुक्रवारी (दि.18) दिला आहे.
कलम १२० ब आणि कलम ३०२ भादवीनुसार दोनवेळा जन्मठेप झालेल्या आरोपींमध्ये राहुल कासट, विनोद अंभोरे, विशाल पाटोळे, राजाभाऊ खंडागळे यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील डी. यू.दराडे यांनी दिली आहे.
या प्रकरणात सतिश करवा (रा. सेलू) यांनी दिनांक ३ मे २०२१ रोजी सेलु पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचा भाऊ सुरेश करवा (मयत) यांचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यु झाल्याप्रकरणी सेलू येथे कलम ३०४ (अ), २७९ भादंवि प्रमाणे दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात यातील मयताच्या पत्नीचे सेलू येथील आरोपी राहुल भिकूलाल कासाट रा. सेलू याच्यासोबत फोनवर विवादास्पद बोलणे झालेली अॅडिओ क्लिप समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने या प्रकरणात संशय निर्माण झाल्याने तत्कालीन पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी या गुन्हयाचा तपास हा सहायक पोलीस अधिक्षक तथा जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांच्याकडे दिला.
या गुन्हयात साक्षीदारांचे जयाब, परिस्थितीजन्य भौतिक पुराये याआधारे यातील आरोपी राहुल कासट याचे मयताची पत्नी हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने यासंबंधांत मयताचा अडथळा येत असल्याने आरोपी राहुल कासट याने आरोपी विनोद अंभुरे, विशाल पाटोळे, राजेभाऊ खंडागळे यांच्या मदतीने खुनाचा कट रचुन सिध्दनाथ बोरगाव शिवारात अपघाताचा बनाव करुन खुन केल्याचे प्राथमिक तपासावरुन निष्पन्न झाल्याने नमुद गुन्हयात कलम ३०२,१२०(ब), २०१ भादंवि वाढ करुन सखोल व बारकाईने तपास करण्यात आला. या गुन्हयाच्या तपासात मयताची पत्नी, आरोपी राहुल कासाट व खुनात प्रत्यक्ष सहभागी असणारे त्याचे तीन साथीदार यांच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व आवाजाचा नमुना परिक्षण करण्यात येवून इलेक्ट्रानिक पुरावे हस्तगत करण्यात आले. तसेच परिस्थितीजन्य भौतिक पुरावे गोळा करुन न्यायवैद्यकीय अहवाल प्राप्त करुन घेतले. गुन्हे संबंधाने साक्षीदारांचे जवाब नोंदविण्यात आले. एकंदरित सखोल तपासअंती आरोपींविरुद्ध सबळ पुरावे प्राप्त झाल्याने परभणी येथे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
आरोपीविरुध्दचा खटला सत्र न्यायालयात अंडर ट्रायल चालला असुन सत्र न्यायालयात अभियोग पक्षाकडुन ५१ साक्षीदार तपासण्यात आले. यात तपासी अधिकारी श्रवण दत्त, सायंटिफिक ऑफिसर रंजित गोरे, वैद्यकीय अधिकारी व महत्त्वाचे साक्षीदार यांची साक्ष व ईलेक्ट्रानिक पुरावे अभियोग पक्षास पुरक ठरुन ते कायद्याच्या कसोटीवर ग्राह्य धरुन यातील आरोपी राहुल भिकुलाल कासाट (वय ४४ वर्ष यास कलम ३०२,१२० (च) या अन्वये दुहेरी जन्मठेप व १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच विनोद भारत अंभोरे (वय ३० वर्षे), विशाल सुरेश पाटोळे (वय ३० वर्षे), राजेभाऊ रुस्तुमराव खंडागळे (वय ३२ वर्षे) या तिघांना कलम ३०२,१२०(ब) या अन्वये दुहेरी जन्मठेप व २५ हजार रुपये, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम श्रेणी) श्रीमती एस. एस. नायर यांनी सुनावली. या गुन्हयाचा तपास श्री सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीस पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांनी केला. तपासात सपोनि कपिल शेळके, पोह गजानन राठोड, पोना सचिन धबडगे, गणेश कौटकर (सायबर सेल) यांनी मदत केली.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता श्री. ज्ञानोबा दराडे यांचे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. त्यांना खटला चालविताना सहायक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम, सय्यद रहमत हबीब, मयुर साळापुरकर, अभिलाषा पाचपोर, नितीन खळीकर, बाबासाहेब घटे, अॅड. महेंद्र कदम, सुहास कुलकर्णी, सुनंदा चावरे, देवयानी सरदेशपांडे तसेच फिर्यादी पक्षाकडून सरकारी वकीलास सहायक म्हणून अॅड. श्री माधवराव भोसले यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंग परदेशी व अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि कपिल शेळके, सपोनि संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, पोलीस अमंलदार प्रमोद सुर्यवंशी, मपोह वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
error: Content is protected !!