एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, एअर एम्ब्युलन्सची झाली व्यवस्था
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईत उपचारासाठी आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांना मुंबईत आणण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. नाथाभाऊंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मीडियाशी संवाद साधताना खडसे यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाथाभाऊंच्या छातीत दुखत होते. आज त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र, खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत डॉ. विवेक चौधरी यांनी मीडियाशी संवाद साधला आणि खडसे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या छातीत बर्निंग सेंच्युरीनचा त्रास होता. ते रुटीन चेकअपसाठी आले. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. रक्तातील साखरही स्तिर आहे. छातीत थोडं कंजेशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करण्याची गरज आहे. अॅन्जिओग्राफी वगैरे करावी लागणार आहे. चेस्ट इन्फेक्शनची ट्रीटमेंट लागू शकते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुढच्या उपचारासाठी मुंबईला नेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. विवेक चौधरी यांनी दिली.
एकनाथ खडसे यांना बॉम्बे हॉस्पिटलला दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोणताच त्रास नाहीये. चेस्टपेन नाहीये. चेस्ट इन्फेक्शन असू शकतं. त्यासाठी ते शिफ्ट होतील. खडसे यांना मुंबईला नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खडसे यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला नेण्यात येत असल्याचं डॉ. चौधरी यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहेत.