गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दातृत्व सेलूतही

लता मंगेशकर यांच्या निधीतून उभारली इमारत

0 186

सेलू, प्रतिनिधी – ज्यांनी आपल्या आवाजाच्या बळावर अख्ख्या जगाला भुरळ घातली अशा ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनानंतर त्यांनी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाला 10 लाख रु निधी शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी दिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
लता मंगेशकर या जेष्ठ गायिका तर होत्याच त्यासोबत राज्यसभा खासदार पण होत्या.त्यांनी आपला खासदार निधी नेहमी समाजउपयोगी कामांसाठी दिला.सेलू मधील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाला त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्यांची गरज होती.त्यावेळी पाथरी येथील जेष्ठ पत्रकार मोहन धारासुरकर यांनी शाळेला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सन 2002 साली तत्कालीन युतीमधील जेष्ठ नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे सहकारी मोहन धारसुरकर यांनी लता दिदींकडे निधीसाठी शिफारस मागितली आणि स्व गोपीनाथ मुंडे यांनी तातडीने शिफारस पत्र दिले.ते पत्र घेऊन धारसुरकर हे स्वतः लता दिदींकडे गेले.त्यावेळी त्यांनी सेलू चे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांची महती लता दिदींना सांगितली व त्यांच्याच नावाने शाळा चालते असे समजल्याबरोबर लता दीदींनी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाला 10 लाख रु एवढा भरीव निधी सन 2002 साली देऊ केल्याची आठवण धारासुरकर यांनी सांगितली.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोविंद जोशी,उपाध्यक्ष ऍड.एल.एम सुभेदार, तत्कालीन सचिव स्व ऍड.वसंतराव खारकर यांनी लता दिदींचे आभार देखील मानले होते.आज लता दीदी यांच्या निधनाने सेलू मध्येही त्यांनी निधी दिल्याची आठवण जागी झाली.आज श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात जेष्ठ गायिका स्व लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

error: Content is protected !!