रस्त्यावर बसले शेतकरी नेते; दिल्लीला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द
दिल्ली,दि 27 ः
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहील असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान, संपूर्ण देशात शेतकरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन आणि रेल्वे रुळावरही आंदोलन करत आहे. या भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसत आहे.
यूपीमध्ये शेतकऱ्यांनी केले चक्का जाम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात यूपी, हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी मागील 10 महिन्यांपासून धरणे आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग, वकील आणि विद्यार्थीही पाठिंबा देत आहेत. पश्चिम यूपीच्या 27 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जर तुम्ही आज महामार्गावर बाहेर जाण्याची तयारी करत असाल तर सावधगिरीने बाहेर जा. सर्व मुख्य रस्ते आणि महामार्गांवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले आहेत.