शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारात झोलझाल…,प्रस्ताव नसताना पुरस्कार, राष्ट्रवादीची तक्रार

0 107

परभणी,दि 20 ः
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर करताना कृषी विभागाकडून अजब कारभार पाहायला मिळाला असून प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्याला डावलून ज्यांचा प्रस्तावच नाही अशांना पुरस्कार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी भूषण, शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी अशा विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यानुसार कृषी विभाग दरवर्षी प्रस्ताव मागवत असतो व याबाबतचे शिफारस पत्र राज्य शासनाला पाठवले जाते त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये सन 2022 या वर्षीच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले होते त्यामध्ये पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश प्रतापराव देशमुख यांचा एकमेव प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे आला होता त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मंगेश देशमुख यांचीच एकमेव शिफारस केली होती तसेच त्यांना 79 गुण देखील दिले होते असे असताना राज्य शासनाने 23 फेब्रुवारी 2024 ला कृषी विभागाने परिपत्रक काढून राज्यातील शेतीनिष्ठ पुरस्कारांची घोषणा केलीय यामध्ये मंगेश देशमुख यांच्या ऐवजी प्रस्ताव नसताना खंडेराव आघाव नामक भाजप पदाधिकाऱ्याचा पुरस्कारात समावेश करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार देत या बाबीची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी व अपात्र व्यक्तीला दिलेला पुरस्कार रद्द करून पात्र मंगेश देशमुख यांना द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

error: Content is protected !!