आधी शिवीगाळ,नंतर मारहाण,शिंदे गटाच्या आमदारावर रोहित पवार संतापले…

0 292

दोन दिवसांपूर्वी शिवसेना ( शिंदे गट ) आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पत्रकाराने केलेल्या टीकेवरून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली होती. आता तेच पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली. ही बातमी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांनी आज पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली. आमदारांच्या समर्थकांच्या गुंडगिरीचा राज्यभरातून निषेध होतोय.
रोहित पवार काय म्हणाले?

पत्रकाराला फोनवर आई- बहिणीवरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची, का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून… विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे.
आप्पा हे वागणं बरं नव्हं… ठाकरे गटातील बहीण संतापली

किशोर पाटील समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
एखाद्या आमदाराने पत्रकारच काय पण कुणालाही अशा पद्धतीने बोलू नये. पाचोऱ्याचा राजकीय वारसा सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तो कायम ठेवला. आताच्या नेत्यांनीही तो वारसा जपला पाहिजे. बाळासाहेबांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतक्या घाणेरड्या भाषेत कुणाला शिव्या दिल्या नाहीत. या प्रकरणाला बाळासाहेबांचं नाव जोडणं योग्य नाही, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर यांचे कान उपटले आहेत.

error: Content is protected !!