विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात हिंदी भाषा महत्वाची – प्रो.डॉ.जयंत बोबडे यांचे प्रतिपादन

0 31

परभणी-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर राजभाषा हिंदी भाषेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी, व्यापार, संगणक इत्यादी माध्यमात हिंदी भाषेने आपले स्थान अबाधित राखले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी मातृभाषेसह हिंदी भाषेतील कौशल्ये आत्मसात करून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे प्रतिपादन प्रो.डॉ.जयंत बोबडे यांनी गुरुवार (दि.०५) रोजी केले.
परभणी येथील केंद्रीय विद्यालयात आयोजित हिंदी पखवाडा आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य राहुल नितनवरे, डॉ.राजेंद्र सावंत, नितीन वाघमारे यांची उपस्थिती होती.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.बोबडे पुढे म्हणाले, हिंदी भाषा देशातील विविध भाषा बोलणाऱ्या लोकांना एकसूत्रात बांधणारी भाषा म्हणून महत्वाची आहे. देशातच नाही तर विदेशातील अनेक राष्ट्रात हिंदी भाषेचा वापर होतो हे भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. जागतिक स्तरावर हिंदी भाषा तिसऱ्या स्थानावर बोलल्या जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषासह हिंदी भाषेला महत्व देण्यात आले आहे. विद्यार्थी ज्या क्षेत्रात आपले करिअर करणार आहेत त्या क्षेत्रात हिंदी भाषेच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करू शकतात. विद्यार्थ्यांनी अनेक भाषा अवगत केल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदाच होतो. त्यामुळे इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषा अशा तिन्हीही भाषा त्यांनी चांगल्या पध्दतीने अवगत केल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राहुल नितनवरे म्हणाले, हिंदी भाषा देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. हिंदी भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक संधी प्राप्त होतात त्याचा फायदा करिअर म्हणून घ्यायला हवा. विद्यालयाच्या वतीने पखवाडा सादर करण्यात आला. यात विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.एवढेच नाही तर शिक्षक- कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा विविध स्पर्धा आयोजित करून हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य करण्यात आले असेही ते म्हणाले. यावेळी हिंदी भाषा पखवाडा निमित्ताने आयोजित शुद्धलेखन, काव्य लेखन, कविता लेखन, नाटक, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण खंदारे, दीपक वाघमारे, आनंद लिपणे, आकाश कार्ले, संजय बसवंते, गोवर्धन कविया, अबरार सिद्दीकी, नाझनिन पठाण, सद्दाम हुसेन यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार डॉ.राजेंद्र सावंत यांनी तर सूत्रसंचालन हर्षदा कदम, अनन्या कुलथे या विद्यार्थिनींने केले. यावेळी शाळेतील बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!