होळी सण
होळी रे होळी पुरणाची पोळी
भारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. होळी सणा दिवशी सगळे लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून होलिका दहन साठी एकत्र येतात. महाराष्ट्र राज्यात आज ६ मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे. तर देशाच्या काही भागात ७ मार्च रोजी होळी साजरी केली जाईल.
फाल्गुन मासी येते होळी,
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी,
राख लावतो आपुल्या कपाळी,
होळीचे नाव ऐकताच मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होते. होळी हा रंगांचा सण आहे ज्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सामील होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा केला जातो. एवढंच नाही तर या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. होलिकादहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते. फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी सण येतो. त्यावेळी रंगीबिरंगी झालेले लोक नाचत गात ठिकठिकाणी फिरतात.
शेतकरी यांचा हा निवांत काळ असतो त्यामुळे हा सण जोमात साजरा होतो. होळी या सणाची महाराष्ट्रातच नाही तर भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धी आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणांचे कृष्ण आणि बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात याला शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्यात होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव” आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी या दिवशी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.
होळीला “गोवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच” असे लहान मुले म्हणतात. लाकडं, गोवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं, गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सव्वाशणी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, काळभारी आहे, अमंगल आहे. त्या सर्वांचा जळून नाश करायचा, नव्याने सांगण्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश असतो.
आख्यायिका…
आपल्या देशात साजरे होणाऱ्या सर्व सणांच्या मागे एक पौराणिक आणि सत्य कथा दडलेली असते. त्याचप्रमाणे होळीत रंग खेळण्यामागेही अनेक कथा आहेत.
लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवा
होलिका दहन…
संपूर्ण भारतात या सणाला होलिकादहन केलं जातं. मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जातं. यासाठी घरोघरी छोटी अथवा सार्वजनिक ठिकाणी लहान मोठ्या होलिका उभारल्या जातात. गावकरी एकत्र येऊन प्रार्थना, मंत्रोउच्चारात होलिकेचं दहन करतात. कोकणात होलिका दहन केल्यावर बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीत नारळ अर्पण करून तिला नैवेद्य दिला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी काही तरबेज गावकरी जळत्या होलिकेत हात घालून तो नारळ काढतात. अग्निदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होलिकादहन केलं जातं.
भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची प्रथा आहे. भांग एकमेकांना देऊन त्याची मजा घेणं हा या मागचा उद्देश्य असतो. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असतो.
धुलीवंदन…
होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात धुळवड अथवा रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते. यामागे सर्वांनी एकत्र येणे हा उद्दिष्ट असतो. रंग हे आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असतात. म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. नाच, गाणी आणि रंग खेळून सगळीकडे धुळवड साजरी केली जाते.
कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव…
कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमग्यालाही कोकणात उत्साहाचं वातावरण असतं. शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमे
फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.
होल्टा होम-
कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात.
कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात.
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर
नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर होतात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते.
उत्तर भारतात होळी जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खासकरून वज्रला जातात.
भारतात विविध ठिकाणी होळीसाठी निरनिराळे खाद्यपदार्थ करण्याची पंरपंरा आहे. होळीचा सण पुरणपोळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच होळीला … होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं म्हणण्याची पद्धत आहे. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक विशेष खाद्यपदार्थ आहे जो विविध सणांना घरोघरी केला जातो. मात्र महाराष्ट्रात होळीला प्रत्येक घरात पुरणपोळी तयार केली जाते.
होळीत थंडाई पिण्याची परंपरा आहे. त्यामुळे घरोघरी थंडाई तयार केली जाते. गुजिया हा पदार्थ होळीसाठी भारतात अनेक ठिकाणी केला जातो. राजस्थानात गुजिया या पक्क्वान्नाला एक महत्त्वाचं स्थान आहे. होळीच्या सणासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, ओरिसामध्ये मालपोहे केले जातात.
वसंत ऋतूच्या आगमनामुळे या काळात वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो. होलिका दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. हा सण हिंदूंचा मुख्य आणि लोकप्रिय सण आहे, परंतु तरीही सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण प्रेमाने साजरा करतात, त्यामुळे या सणामुळे एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छाज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका