“माझी झोपच उडालीय, मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत

0 344

नागपूर – आगामी निवडणुकीत बारामतीमध्ये पवारांचा करेक्ट कार्यक्रम करु, असे वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते वक्तव्य ऐकल्यापासून माझी झोपच उडाली आहे. मला तेव्हापासून आम्हा सर्वांची झोप हरपली आहे. एवढा मोठा ताकदीचा नेता, अशा पद्धतीचे आव्हान देत आहे. मी तर विचार करतोय की, राजकारणातून संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली. ते गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

अजित पवारांनी नागपुरात बोलताना सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरून चंद्रशेखर बवनकुळेंनी नागपुरात विधान केलं. “खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे.माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

यावेळी अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी केली. गायरान घोटाळ्यासंदर्भात सरकारकडून अपेक्षित उत्तर आलेले नाही. आता राज्य सरकार अधिवेशन आटोपण्याच्या तयारीत आहे. मात्र, गायरान घोटाळ्यासंदर्भात उत्तर दिल्याशिवाय त्यांना अधिवेशन संपवता येणार नाही. अब्दुल सत्तार यांनी गायरान घोटाळ्यासंदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणाला अर्थ नाही. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायरान घोटाळा गेल्या सरकारच्या काळात झाल्याचे म्हटले. हा घोटाळा कोणाच्या काळात झाला हे महत्त्वाचे नाही. जेव्हा घोटाळा लक्षात येतो तेव्हा त्याची दखल घेतली पाहिजे. एखादी व्यक्ती दोषी असेल तर ती माहिती समोर आणली पाहिजे. गायरान घोटाळ्यासंदर्भात थातुरमातूर उत्तरं देण्यात अर्थ नाही. घोटाळा कोणत्याही काळातील असो, तो समोर आल्यानंतर कारवाई झालीच पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. दरम्यान, विरोधकांनी आज पुन्हा एकदा विधिमंडळाच्या आवारात घोषणाबाजी केली. ‘खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके, माजलेत बोके’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या.

 

 

“अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात. अंडरग्राऊंड होतात. कधी रडतात. असे अजित पवार बघितले आहेत आम्ही. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये. त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे इथून पुढे नागपुरात अजित पवारांनी अशी भाषा करू नये”, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!