आता ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर..परंतु घातली मोठी अट
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता ‘लाडका भाऊ’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. आता ‘लाडका भाऊ’ योजना नेमकी काय आहे, यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पंढरपूर येथील कार्यक्रमात सांगितली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले, “आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे.”
एकनाथ शिंदे म्हणाले, “या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.”
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची व्याप्ती
कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने आहे. उदयोगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहे.प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी उपलब्ध होणार असून या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी 1 असे एकूण 50 हजार योजनादूत नेमणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुठं सुरु होणार?
उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. या उद्योगानं कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. उद्योगाची स्थापना 3 वर्षापूर्वीची असावी. EPF,ESIC,GST, Certificate of Incorporation, DPIT आणि उद्योग आधार नोंदणी केलेली असावी. तसेच .शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स,आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. ज्या कंपन्यांमध्ये किमान 20 कर्मचारी कार्यरत असतील त्या या योजनेसाठी पात्र असतील.
बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी योजना
मुख्यमंत्री ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल.
मूळचा महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती असणं गरजेचं
‘लाडका भाऊ’ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.ही मोठी अट घातली आहे. तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक असणार आहे.
‘लाडका भाऊ’ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक?
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- बँक खाते पासबुक
- ई-मेल आयडी
‘लाडकी बहीण’ योजनेनंतर लाडक्या भावांसाठी योजना
दरम्यान अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहिणींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे.