पुणे-परभणी मार्गावर जादा बस सोडा- भाजपा नेते डॉ.केदार खटींग यांची मागणी
परभणी,दि 25ः
पुण्याहून परभणी कडे येणाऱ्या जाणाऱ्या बस संख्येत वाढ करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे परभणी विधानसभा समन्वय डॉ.केदार खटींग यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांची भेट घेऊन केली आहे. तसेच खाजगी बसची दरवाढ रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
परभणी जिल्ह्यातील बहुतांश नागरिक, युवक तसेच विद्यार्थी शिक्षण, नोकरीसाठी पुणे आणि पुण्याच्या सभोवताली वास्तव्यास आहेत. दिवाळी सणा निमित्त आपल्या मूळ गावी येण्यासाठी मोठ्या संख्येने मूळचे परभणीकर असलेले नागरिक पुण्याहून येत आहेत, परंतु सणासुदीच्या काळात अपुऱ्या बसमुळे पुण्याहून परभणीला येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पुण्याहून परभणीला येण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी मोठ्या संख्येने बस सोडाव्यात अशी मागणी डॉ. केदार खटिंग यांनी केली आहे. ज्याप्रमाणे कोकणात गौरी गणपती उत्सवासाठी ज्यादा बसेस सोडल्या जातात त्याचप्रमाणे परभणी साठी देखील जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी डॉ.खटिंग यांनी केली आहे.
आरटीओ विभागाला दिले निवेदन
सध्या पुणे मुंबई या मार्गावरून परभणीकडे ये जा करणाऱ्या खाजगी बस चालकांनी आवाजही भाडेवाढ केली आहे, तीन ते चार पटीने भाडे वाढले असून ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याने परिवहन विभागाने यावर कारवाई करत अवाजवी भाडेवाढ करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी डॉ.खटिंग यांनी केली आहे.याबाबत उपप्रादेशीक परिवहण अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.