राज्यातील करामतीकारांना सत्तेचाच कायम ध्यास…!
क्रोनोलॉजी को समजीए…!
२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात आघाडीच्या सत्तेला आरसा दाखवत भाजपा शिवसेना युतीची सत्ता आली. या युतीच्या सरकारने प्रचंड मेहनत घेत कामही केले परन्तु,विरोधी बाकावर बसलेले काका,मामा,दादा अशी जी काही विविध पक्षातील मंडळी होती,त्यांनी मात्र युती सरकारच्या मुख्यमंत्री व मंत्र्यांना विविध पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला परन्तु युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ या विरोधकांना पुरून उरले. या ५ वर्षाच्या कालावधीत विविध जातीनिहाय आंदोलन मोर्चे निघाले,दंगली घडविल्या गेल्या कशासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित व्हावी म्हणून! आणि याचा आधार घेत विद्यमान युती सरकारला पाय उतार करण्यासाठी काका,मामा,दादा आदी.सर्व विरोधी बाकावरील मंडळींना फायदा घेता येईल. परन्तु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः कायदेपंडित असल्यामुळे अश्या करामतींना बळी पडण्याइतके तर निश्चितच राजकारणात कच्चे नव्हते व नाहीतही हे महाराष्ट्रातील जनतेने उघड डोळ्याने पाहिले व अनुभवले…
या मोर्चांमागे उद्देश एकच होता की सत्ता मिळवायची म्हणूनच २०१९ सालच्या निवडणुकांत जनतेकडून “महाजनादेश” युतीलाच मिळाला होता. परन्तु करामती करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रह धरणारे काका यांनी उपमुख्यमंत्री पद आपल्या पुतण्यालाच बहाल केले.
महाजनादेशाचा अनादर करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले गेले,यात सत्ता उपभोगणे हाच उद्देश ठेवून काम करणाऱ्या विविध पक्षाच्या मंत्र्यांनी प्रचंड मोठमोठे घोटाळे केले,यात १०० कोटी वसुली,मुंबईतील जमिनी नामांतरण असेल,रिसॉर्ट बंगले बांधकाम,बुलढाणा अर्बन बँक प्रकरण,विविध बँकांना बुडीत केले,विविध सहकारी साखर कारखाने खासगीकरण केले.
(तेही मंत्री,आमदार,खासदार यांचे नातेवाईक किंवा कार्यकर्ते यांच्या नावे झाले.),शासकीय भरती घोटाळा,पत्राचाळ प्रकरण आदी. अश्या विविध घोटाळ्यांसाठीच बारामतीच्या काकांनी विविध करामती करून हे सरकार/सत्ता स्थापन केले होते का? याच सर्व व्यवस्था व भ्रष्टाचारी विषयाला कंटाळून तत्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री यांनी यांच्या समवेत ४०+ आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडण्याचा गुप्त निर्णय घेतला आणि मुंबई ते सुरत ते गुवाहाटी व महाराष्ट्र सत्तास्थापन हा सर्व प्रकार कसा घडला,कशासाठी घडला,याचे मुख्य कारण काय? हे सर्व जनतेनी उघड डोळ्यांनी पाहिले.
विद्यमान सरकार सत्तेसाठी धडपड करणारे नसून जनसेवेसाठी असल्याची भावना जनतेत आहे,याचे कारण सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अनेक मंत्री मंत्रालय किंवा त्यांचे निवासस्थान येथून जनतेसाठी काम करत आहेत. हे उघडडोळ्यांनी जनता पाहतेय व अनुभवतेय.
सत्ता ही उपभोगायची नसते,सत्ता मिळवून जनहिताची कामे करावी लागतात,तरच राज्यात स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवू शकता. राज्यातील विद्यमान युती सरकार कार्यकृतीतून दाखवून देते आहे.
विरोधकांच्या करामती कायम दिसून येत असतात. यात आरक्षण,सीमावाद,महापुरुषांच्या वक्तव्यावरून उफाळवलेला वाद असो. राजकारणात समाजकारण आणले की राज्याच्या व्यवस्थेची वाट लागते हे करामतीकारांना चांगलेच ठाऊक आहे,त्यामुळेच हे विविध पद्धतीने करामती करत या राज्यातील तरुणांना कायम सरकार विरोधी भडकवताना दिसून येते आहे. या राज्यात ज्याचे महाविद्यालयीन जीवन असते म्हणजे उच्चशिक्षण घेऊन स्वतःचे कुटुंब चालविण्यासाठी विचार करावयाचा असतो तोच महाराष्ट्रीयन/मराठी बांधव आंदोलनात सहभागी होतो,दंगली झाल्या की शासनाने दाखल केलेल्या केसेस मध्ये तो नामवन्त होतो आणि आयुष्याची माती करून कुटुंबीयांकडे असलेली शेती करण्यासाठी नांगर हातात धरतो. हेच का आपल्या राज्यातील अनुभवी नेत्यांचे संस्कार? ही काय आपल्या राज्याची संस्कृती? एखादा मंत्री,आमदार,खासदार मयत झाला की तुम्हाला आठवते आपली संस्कृती,सहानुभूती,संवेदना त्याचवेळी का आठवते हो! याचे कारण त्यामयत व्यक्तीचा मुलगा किंवा अन्य कार्यकर्ता तुम्हाला निवडून आणायचा असतो म्हणून ना! तर मग हीच संस्कृती, सहानुभूती,संवेदना माझा शेतकरी राजाचा मुलगा जेव्हा शिक्षणासाठी शहरात येतो तेव्हा त्याला आंदोलनात सहभागी करून घेतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात पुढे तो काय करतो,कसे जीवन जगतो हे पाहण्यासाठी नाही का येत तुमची संस्कृती,सहानुभूती,संवेदना! विरोधकांनी विरोध करायचा असतोच हो! पण त्यात राजकीय सूड भावना नसावी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे.
राज्याची विधानसभा/भवन हे जनतेच्या न्यायाचा प्राथमिक वर्ग आहे. इथं जर लोकप्रतिनिधीने आवाज उचलून न्याय नाहीच मिळाला तर – न्यायमंदिर,न्यायालय हे तर सर्वोच्च मानलेले आहेच. परन्तु इथेही काही आपुलकी,भावना,संवेदना जपल्या गेल्या तर निश्चितच जनता सर्व पक्षीय नेत्यांचा आदर करेल. पण सत्ता मिळविण्याचे ध्येय बाळगून जर राज्यभर आंदोलने,मोर्चे,सीमावाद,जातीयवाद पेटविणार असाल तर निश्चितच जनता तुम्हाला ‘माफ नाही करणार’…! योग्य दिशा दाखवून दशा करेल. हे ध्यानात ठेवा.
–
लेखक
युवा पत्रकार गजानन जोशी
9403102979