शिवजयंतीपासून गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब…वाचा गीताचा इतिहास

0 35

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. त्यानुसार ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली होती. सांस्कृतिक विभागाच्या या निर्णयाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या गीतातून महाराष्ट्र राज्याचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचे वर्णन करण्यात आलेले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऑक्टोबरमध्ये या गाण्याची घोषणा केली होती. तर आज मंगळवारी (दि.31, जानेवारी) मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. यानिमित्त जाणून घेऊया, या गाण्याचा इतिहास, हे गाणे कोणी लिहले, केव्हा गायले गेले आणि त्याला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला.

11 राज्यांनाच स्वतःचे राज्यगीत

सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत झाले आहे. अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला मान्यता देण्यात आली आहे.

कोणी लिहले गीत, कोणी केले गायन

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे कवी राजा बढे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलेले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. 2015 साली शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने हे गीत पुन्हा रिलीज करण्यात आले आहे, असे देखील जाणकारांनी सांगितले आहे.

यशवंतराव चव्हाणांसमोर गायले होते गीत

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

1.15 ते 1.30 मिनिटं चालेल गाणे

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत 1.15 ते 1.30 मिनिट चालेल. राष्ट्रगीताची वेळ देखील फक्त 52 सेकंद आहे. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीतानेच संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

सर्वांच्या मुखात

महाराष्ट्राला मिळालेले राज्यगीत सर्वांच्याच तोंडी असलेले एक सुप्रसिद्ध गीत असून त्याला अंतिम करण्यात आले होते. ‘जय जय महाराष्ट्र माझा., गर्जा महाराष्ट्र माझा’ या मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली.

 

‘जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे उत्साह व प्रेरणा देणारे गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे संपूर्ण गीत साडेतीन मिनिटांचे आहे. त्यामुळे अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला.

गर्जा महाराष्ट्र राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

 

error: Content is protected !!