आत्महत्या प्रतिबंधासाठी जनजागृती हेच मानसिक लसीकरण – डॉ. जगदीश नाईक

0 25

परभणी: आपल्या समाजातील जवळच्या व्यक्तींचे, प्रियजनांचे जीव वाचवायचे असतील तर प्रत्येकानी आत्महत्या रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी समाजात याबाबत जाणीव जागृतीचे मानसिक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. जगदीश नाईक यांनी केले.

येथील शारदा महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन(10सप्टेंबर) व जागतिक अल्झायमर दिन (21सप्टेंबर ) या निमित्ताने मनोविश्र्व भित्तीपत्रकाच्या विमोचन प्रसंगी परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. जगदीश नाईक यांचे व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना डॉ.नाईक म्हणाले की, जगात दर 40 सेकंदाला एक आत्महत्या घडत असते या नोंदणीकृत आकड्या वरूनच आत्महत्या प्रतिबंध किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी अनेक संकेताद्वारे आत्महत्यांचे विचार प्रकट करतात मला जीवन नकोसे झाले आहे, जीवन संपवावे वाटत आहे, सतत उदास वाटत आहे, मी एकटा आहे, गुड बाय फॅमिली असे स्वतःच्या भ्रमणध्वनीवर स्टेटस ठेवतात किंवा इतरांजवळ कळत नकळत बोलतात, अशावेळी वेळीच मदत मिळायला हवी तर आपण त्यांना वाचवू शकतो. आपल्या समाजातील जवळच्या व्यक्तींचे, प्रियजनांचे जीव वाचवायचे असतील तर प्रत्येकानी आत्महत्या रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी समाजात याबाबत जाणीव जागृतीचे मानसिक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. अल्झायमर हा वृद्धांना होणारा स्मृतिरहासाशी संबंधित आजार असून ह्याच्यावर उपचार नाहीत परंतु होणारा स्मृतीचारहास वेळीच मिळालेल्या उपचाराने थांबवू शकतो.असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. वैशाली देशपांडे म्हणाल्या की आत्महत्या, अल्झायमर या विकृतीला बळी पडणाऱ्या व्यक्तींना उपाचारासोबत मानसिक आधाराची गरज असते. मनिविश्र्व या भित्ती पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी विचारपिठावर मान्यवरांसह आय क्यू ए सी समन्वयक डॉ.संतोष नाकाडे, डॉ . एन.व्ही. सिंगापुरे उपस्थित होते. एम.ए.मानसशास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून प्रथम आल्याबद्दल समिंद्रे अतुल याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.राहत परवीन यांनी केले, प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. सिंगापुरे यांनी तर आभार प्रा. लिंगायत माणिक यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. गोपाल पेदापल्ली, प्रा.सानिया सदफ, सानिया फातेमा अन्सारी, शेख शबाना बेगम, संतोष गायकवाड, नसिरोड्डीन काझी यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!