Breaking News : राहुल गांधींना सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

0 225

 

सुरत – 2019च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

 

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टाने जामीन दिल्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र वायनाडच्या खासदाराला 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला.

 

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यावर निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. त्यानंतर 20 मिनिटात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. सुनावणीच्यावेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात हजर होते. यावेळी गुजरातमधील काँग्रेसचे अनेक बडे नेतेही कोर्ट परिसरात उपस्थित होते.

 

 

माझा हेतू चुकीचा नव्हता
यावेळी राहुल गांधी यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. माझा हेतू चुकीचा नव्हता. मी जे बोललो ते केवळ एक राजकारणी म्हणून बोललो. मी नेहमीच देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आला आहे, असं राहुल गांधी यांनी कोर्टाला सांगितलं. राहुल गांधी यांच्या विधानाने कुणाचंही नुकसान झालेलं नाही. अशावेळी या प्रकरणात कमी शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती.

 

तर राहुल गांधी यांना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे, तसेच त्यांना दंडही ठोठावला पाहिजे, अशी मागणी पूर्णेश मोदी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती. त्यानंतर हा निर्णय आला. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. त्यांना जामीनही मिळाला. आता ते वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहेत, असं त्यांच्या वकिलाने सांगितलं.

 

error: Content is protected !!