वाचन हा जीवन समृद्धीचा मार्ग-अक्षर व्याख्यानमालेत जयदेव डोळे यांचे प्रतिपादन

0 49

सेलू, प्रतिनिधी – पुस्तके ही सच्ची मित्र असतात. पुस्तकांच्या वाचनाने ऊर्जा मिळते. त्यामुळेच वाचन हा जीवन समृद्ध करणारा मार्ग आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रा. जयदेव डोळे ( औरंगाबाद ) यांनी शहरातील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात गुरुवार ( दि.२१) रोजी आयोजित अक्षर व्याख्यानमालेत ‘ समृद्ध जीवनासाठी वाचन ‘ या विषयावर बोलताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे हे होते. तर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सुनिता डोळे, सुनिता काळे, रामराव बोबडे ,त्र्यंबक वडसकर, डॉ.दिलीप शृंगारपुतळे, बबन आव्हाड यांची उपस्थिती होती. शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने सेलूकर शिक्षकांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्यसाधून आयोजित या अक्षर व्याख्यानमालेस पहिल्याच वर्षी श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रा.जयदेव डोळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की ,’ आजच्या सोशल मीडियाच्या काळात वाचनाचा प्रवास हा कागदापासून काचेपर्यंत झाला. त्यामुळे गैरसमज, अफवा जास्त पसरत असून माणसं सत्यापासून दूर जात आहेत. परंतु स्वतःची स्वतंत्र मत, विचार , जग निर्माण करणारे. लोकशाहीला बळकटी देणारे वाचन हे संगणक, मोबाईलच्या काचेवर नाही तर पुस्तके, वर्तमानपत्राच्या प्रत्यक्ष कागदावरच व्हायला हवे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचली, विकत घेतली पाहिजेत.’ असेही जयदेव डोळे म्हणाले.

कार्यक्रमात आपआपल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ग्रंथपाल शिवाजी शिंदे , कला शिक्षक किशोर कटारे , संभाजी रोडगे, रांगोळीकार रूपाली कान्हेकर यांचा. तर वाचक म्हणून जिल्हा परिषद प्रशाला रायपूर येथील विद्यार्थी वैष्णवी सिद्धार्थ मस्के , सोहम सुंदर उंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी केले. भुमिका सुरेश हिवाळे यांनी सांगितली. पाहुण्यांचा परिचय डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी दिला. सुत्रसंचलन रामराव गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद ठाकर , बाळू बुधवंत, रमेश नखाते , प्रा.नागेश कान्हेकर, डॉ. अशोक पाठक, नरेश पाटील , माधव गव्हाणे , प्रशांत नाईक, दत्ता रोकडे, माणिक सुरवसे,शेख मौजम,दगडोबा माघाडे, भगवान पल्लेवाड आणि संयोजक शिक्षकांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!