इंद्रियांचा संयम ,योग्य विचार ,समाधान व साधू संतांचा सहवास हे मोक्षाचे चार द्वार आहेत-स्वामी गोविंदगिरीजी महाराज

0 1

 

सेलू / नारायण पाटील – इंद्रियांचा संयम ,योग्य विचार ,समाधान व साधू संतांचा सहवास हीच मोक्षाची चार द्वार आहेत .असे प्रतिपादन स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सेलू येथे आयोजित राम कथेच निरूपण करतांना केले .
येथील बिहाणी परिवाराच्या वतीने नूतन विद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या भव्य अशा ” हनुमान गढ ” येथे दि १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत अयोध्या येथील राम मंदिर न्यास चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज ( किशोरजी व्यास ) यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून मराठी मधून राम कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे .

 

आज तिसऱ्या दिवशी द्वारका धाम चा देखावा तसेच कन्हया व त्याचे सर्व सवंगडी यांची वेशभूषा साकारण्यात आली होती .यावेळी स्वामींच्या हस्ते दहीहंडी फोडून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .
बिहाणी परिवारातील सर्व सदस्यांनी यावेळी ग्रंथाचे पूजन करून आरती केली .
यावेळी बोलताना स्वामी पुढे म्हणाले की ,राक्षसी प्रवृत्ती हा तामसी गोष्टींचा हव्यास आहे तर यज्ञ ही पावित्र्याची आराधना आहे
भूतलावावरचा उन्नत व प्रौढ तसेच भगवत गीतेच्या वक्त्याला उपदेश केलेला ग्रंथ म्हणजे ३२ हजार श्लोक असलेला “योग वाशिष्ठी “हा आहे . हा माणसाला जिवंतपणी मुक्ती देणारा ग्रंथ आहे स्वतःला अज्ञानाची जाणीव झालेल्या व्यक्तीच ज्ञान मिळवण्यासाठी धडपडत असतो .तीर्थ यात्रा व ग्रंथ पारायण केल्याने पुण्य मिळते परंतु मुक्ती साठी विचार हाच सर्वोत्तम उपाय आहे .कारण माणसाला काळ म्हातारा करीत नाही.तर त्याच्या डोक्यातील अवास्तव विचार म्हातारे करीत असतात .मोबाईल मुळे जगाचा डेटा आपल्या हातात असला तरी अंतरंगातील डेटा आपण घालवून बसलो आहोत .ही एक खंतच आहे .

 

सतत पाण्यात राहून कमळाची पाने कोरडी असतात त्याप्रमाणे संसारात राहून देखील ज्याचे मन अलिप्त राहते त्यालाच योगी म्हणतात .
देहाने केलेल्या गोष्टीचा मनाला विचार झाला नाही पाहिजे .क्रिया कोणती आहे त्यापेक्षा त्या क्रियेमागील हेतू बघून मूल्यमापन करणे गरजेचे आहे .असे यावेळी स्वामीनी स्पष्ट केले .
नुसता राजा धार्मिक असून चालत नाही .कारण दशरथ व जनक दोन्ही राजे अत्यन्त धार्मिक होते .परंतु त्यांच्या राज्यात राक्षसी वृत्ती च्या उपद्रवासामुळे विश्वामित्राला ६ दिवसाचा यज्ञ करता आला नाही . व त्यांना पुढच्या पिढीतील नेतृत्वाला म्हणजे रामाला सोबत न्यावे लागले .व केवळ १६ वर्षाचे वय असतांना प्रभुराम चंद्राने आपल्या कर्तृत्वाने राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट केला .

 

हाताने चालवले जातात ते शस्त्र असतात तर मंत्राने चालवले जातात ते अस्त्र असतात .व विश्वमित्रानी आपल्यातील सर्व शक्ती रामाला देऊन अजेय केले होते .परंतु नियमांच्या पालनासाठी निष्ठा आवश्यक असते व ती निष्ठा रामा जवळ होती .
भविष्यात चांगली पिढी घडवायची असेल तर महापुरुषांचे चरित्र व पराक्रम तसेच पूर्वजांचा रोमहर्षक इतिहास आठवणे ही काळाची गरज आहे .जिजाऊ नी लहानपणी योग्य संस्कार केल्यामुळेच शिवाजी महाराज छत्रपती झाले .परंतु सध्या मात्र सर्वत्र संस्काराचे अधःपतन होतानाच दिसून येत आहे .
भक्ती शिवाय मुक्तीचा मार्ग मिळूच शकत नाही .चांगल्या गोष्टींचा ध्यास मनाला लागला तर निश्चितपणे चित्ताची शुद्धी आपोआप होते .असेही स्वामींनी यावेळी स्पष्ट केले .

 

प्रत्येक पापाला प्रायश्चित असते व त्यातुनच महर्षी गौतमी ची पत्नी अहिलेचा रामाच्या पदस्पर्षाने दगडी शिळेतून उद्धार झाला .
प्रत्येक महिलेने दुर्गा झाले पाहिजे तर मुलींनी नराधमापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लाठी काठी व कराटे चे शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन देखील यावेळी स्वामींनी उपस्थित महिला व मुलींना केले .

 

सध्या देशसेवेसाठी सीमेवर लढण्यासाठी लष्करी ताफ्यात गेलेल्या तरुणांच्या पालकांचा बिहाणी परिवाराच्या वतीने स्वामीच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला .शेवटी सामूहिक आरतीने आजच्या कथेचा समारोप करण्यात करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प प्रा संजय पिंपळगावकर यांनी केले तर वेशभूषेसाठी रवी कुलकर्णी ,रवी मुळावेकर ,भालचंद्र गांजापूरकर व शशिकांत देधपांडे यांनी सहकार्य केले .

error: Content is protected !!