छगन भुजबळांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी
मुंबई/ सांगली : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी टीकास्त्र सोडलं. ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी माडंली. भुजबळ यांच्या जालन्यातील आक्रमक भाषणाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी,अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.