शिवरायांच्या विचारासह कार्य सदैव प्रेरणादायीच- प्रा.सुभाष ढगे
जिल्हा वकील संघाच्या वतीने शिवजयंती साजरी
परभणी, 21 छत्रपती शिवराय चारित्र्यसंपन्न व नितिवान राजे होते. आयुष्यभर शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान केला. धर्म सहिष्णूतेचा पुरस्कार करून मानवतावादाचा विचार या मातीत रूजवला. पर्यावरण संवर्धन , जलसिंचन यासाठी विधायक कार्य करीत आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्यामुळे शिवराय आज प्रासंगिक तर आहेतच पण सोबतच त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायीच आहेत असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.सुभाष ढगे यांनी सोमवार (दि.२०) रोजी परभणीत केले.
परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॅड.एम.एस. सोळंके, प्रमुख पाहुणे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जयंत बोबडे,अॅड.बी.टी. पौळ, अॅड.अमोल गिराम, अॅड. सोमनाथ व्यवहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘प्रेरणादायी शिवचरित्र’ या विषयावर बोलताना प्रा.ढगे पुढे म्हणाले,डोळ्यासमोर शेतकरी हित, प्रजाहित ठेऊनच स्वराज्य उभे केले. म्हणूनच तर शिवराय रयतेच्या मनातील तारणहार बनले. जातीव्यवस्था नष्ट करून त्यांनी सर्व जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. मराठी माणसाचा स्वाभिमान जागा केला व त्यांना अन्याय अत्याचाराविरूद्ध लढायला तयार केले असेही ते म्हणाले. डॉ.जयंत बोबडे बोलताना म्हणाले, शिवरायांचे राज्य सामान्यांना न्याय देणारे होते. जेव्हा जगात कोणत्याच देशात राज्यघटना अस्तित्वात नव्हती तेंव्हा जिजाऊ-शिवराय नावाची राज्यघटना स्वराज्यात न्याय देण्याचे कार्य करीत होती. नेपोलियन बोनपार्टपेक्षा शूरवीर असलेले छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने सम्राट होते. शिवराय एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. त्यामुळे ते डोक्यात घेण्याचा विषय आहे. वर्तमानकाळातील युवकांनी शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. आजच्या काळात बुद्धिवादी लोकांनी महामानवाचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात अॅड.एम.एस. सोळंके म्हणाले, महामानवाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या त्यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी साजरे करायचे असतात. आजची परिस्थिती लक्षात घेता समाजाला महामानवाच्या विचारांचा विसर पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आपण साजरी करीत असलेली जयंती दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अॅड.रामजी चव्हाण, अॅड.अशोक सोनी, अॅड.आर.बी.वांगीकर, अॅड. राजेश चव्हाण,अॅड. सुनील बागल, अॅड.सोमनाथ व्यवहारे,अॅड. श्याम झिंजान, अॅड.रवी गायकवाड,अॅड.मुजाहि, अॅड.अजय व्यास,अॅड. एस.जी.देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अॅड.विनायक चौखट यांनी केले. यावेळी जिल्हा वकील संघातील बहुतांश वकिलांची उपस्थिती होती.