श्रीराम नवमी…

0 84

लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रम रघुवंशनाथम् ।
कारुण्यरुपं करुणाकरं तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ।।
भारतीय भूमी ही नेहमीच पवित्र भूमी राहिली आहे, इतिहासानुसार येथे अनेक देवी-देवतांनी अवतार घेतला आहे. या इतिहासावर लक्ष केंद्रित केले तर जेव्हा रावणाचे अत्याचार खूप वाढले आणि लोक अस्वस्थ झाले, तेव्हा पुन्हा या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी भारतीय भूमीवर महापुरुषाचा जन्म झाला. या महापुरुषाचे नाव भगवान राम होते, ज्यांनी रावणाच्या अत्याचारातून मुक्ती मिळवली आणि त्यावेळी लोकांचे रक्षण केले. त्रेतायुगात जन्मलेल्या भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

चैत्र महिन्यात दुर्गा मातेचीही पूजा केली जाते आणि नवरात्री पाळली जाते. नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे राम नवमी. चैत्र नवरात्रीची सुरुवात २२ मार्च रोजी झाली आणि आज ३० मार्च रोजी नवरात्रीच्या नवव्या दिवशी रामजनम “राम नवमी” साजरी केली जात आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात. या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तन होते. लोकांना सुंठ-साखरेचा प्रसाद वाटला जातो.

रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते.
श्रीरामांना पुजेत केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करतात.
श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.या दिवशी बरेच लोक राम प्रकट करण्यासाठी उपवास ठेवतात आणि भगवान रामाची आठवण करतात.

राम जन्म कथा-
हिंदू धर्मग्रंथानुसार, त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्री राम म्हणून अवतार घेतला.
श्रीराम हा दशावतारातील सातवा अवतार आहे. लंकेचा राक्षस राजा रावण याने श्रीशंकरांकडून वर मिळवला आणि तो गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला. रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णूच श्रीरामांच्या रूपाने अवतरले.
श्री रामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला.

रामायणानुसार, अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही, त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती. यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषिश्रृंगासोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला.

यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषीशृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खीरची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. बरोबर ९ महिन्यांनंतर, राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम, भगवान विष्णूचा सातवा अवतार,  कैकेयी यांनी  भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला.

मोठे झाल्यावर श्रीराम वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षे वनवासाला गेले, ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यानंतर दशरथाचा पुत्रशोकामुळे मृत्यू झाला.

वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले, तेव्हा श्रीरामांनी वानरसेनेसह लंकेवर चालून जाऊन युद्धात रावणाचा वध केला.
लव-कुश हे श्रीराम व सीता यांचे जुळे पुत्र. त्यांनी राज्यकारभार सांभाळण्यासाठी सक्षम होई पर्यंत काही वर्ष रामाने राज्य केले. त्या काळातही एक आदर्श राजा म्हणून त्यांनी अयोध्येचा कारभार पाहिला. त्यानंतर श्रीरामांनी आपले अवतारकार्य पूर्ण केले.

मारुती हा प्रभू रामचंद्र यांचा एकमेव एकनिष्ठ,  विश्वासू , ताकतवान, बलवान ,सामर्थ्यवान असा भक्त म्हणून त्याचा नावलौकिक आहे.
श्रीराम हे भारतवासीयांचे फार आवडते दैवत आहे. श्रीराम हे एक आदर्श पुरुष होत. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम असेही म्हणतात. मातृ-पितृभक्ती, बंधुप्रेम, सत्य-वचनाचे व्रत, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. ते एकवचनी होते. त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला ‘रामराज्य’ असे म्हणतात.

कबीर साहेब जी आदिरामाची व्याख्या स्पष्ट करतात की आदिराम हा अविनाशी देव आहे जो सर्वांचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. ज्याच्या एका इशाऱ्यावर पृथ्वी आणि आकाश कार्य करतात, ज्याच्या स्तुतीमध्ये तेहतीस श्रेणी देवी-देवता नतमस्तक होतात. जो पूर्णपणे मोक्ष आणि आत्मस्वरूप आहे.

महर्षी वाल्मिकी म्हणतात ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदु म्हणजे प्रभु श्रीराम’. राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्याक्षणी तो अत्यानंदीत झाला नाही आणि पुढच्या काही क्षणांत अयोध्या सोडुन चौदा वर्षे वनवासाची बातमी कानावर पडल्यावर तो शोकमग्न देखील झाला नाही… वडिलांची आज्ञा प्रमाण मानुन वनवासाला निघतांना तो किंचीत देखील डगमगला नाही.

एवढा मोठा बलाढ्य राजा रावण महान शिवभक्त असुन देखील प्रभु श्रीरामचंद्राला अखेरीस शरण आला तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच. यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथीमहारथी देखील अखेरीस शरण येतात…

श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्याबद्दल इतके प्रसिद्ध होते कि, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना ‘ रामः शास्त्रामृतामहम् ‘ अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे.

 

श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगतात. रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र त्यांच्याकडून म्हणवून घेतात. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. इतकेच काय, एकमेकांशी कुठेही गाठ पडली, तरी लोक याच रामनामाने एकमेकांना अभिवादन करतात व म्हणतात ‘राम राम!’

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र
आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम् ॥
। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ।

ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

error: Content is protected !!