पाथरीत राष्ट्रवादीकडून श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांना उमेदवारी,महायुतीत संचारला उत्साह
परभणी,दि.23
पाथरी विधानसभा मतदारसंघातून आपेक्षेप्रमाणे महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती निर्मलाकाकी उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे पाथरी,सोनपेठ,मानवतमधील महायुतीच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.
पाथरी मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट या तीन्ही मित्रपक्षाने दावा केला होता.परंतु या मतदार संघात विटेकर घराण्याची ताकद आणि वलय पहाता ही जागा राष्ट्रवादीने लढवावी असा सुर महायुतीत निघाला.त्यातून विजय पाहीजे असेल तर विटेकर घराण्यातच उमेदवारी दिली पाहीजे असा संदेश महायुतीच्या नेत्यांना दिला गेला.त्यामुळे आ.राजेश विटेकर यांच्या शिवाय मतदार संघात तुल्यबळ उमेदार नसल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भक्कम उमेदवार म्हणून विटेकर कुटूंबियातील सदस्यांनाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य राजेश विटेकर यांच्याच नावाचा प्रामुख्याने विचार सुरु केला. परंतु, पर्याय म्हणून राजेश विटेकर यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांच्या उमेदवारीबाबत श्रेष्ठींनी गांभीर्याने विचार विनिमय सुरु केला. त्यामुळे विद्यमान आमदार विटेकर किंवा त्यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाकाकी या दोघांपैकी एकाची उमेदवारी मिरिट बेसवर निश्चित होईल, असे चित्र हळूहळू स्पष्ट होवू लागले होते. या दरम्यानच सोमवारी राष्ट्रवादीच्या श्रेष्टींनी विद्यमान आमदार विटेकर यांच्याकडे पाथरीतील कोरा एबी फॉर्म सुपूर्त केला.आणि कुटूंबात कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय त्यांच्यावर सोपवला.अखेर कुटूंबात व कार्यकर्त्यांत विचारविनीमय होऊन श्रीमती निर्मलाकाकींना उमेदवारी देण्याचे निश्चीत झाले.त्यानुसार राष्ट्रवादीने बुधवारी आपल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर केली,त्या पहिल्याच यादीत श्रीमती निर्मलाकाकी यांना उमेदवारी मिळाली.यामुळे पाथरी,सोनपेठ,मानवत,परभणी ग्रामीण या भागातील महायुतीच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.
श्रीमती निर्मलाकाकी विटेकर यांचा राजकीय प्रवास
1996-जिल्हा परिषद सदस्य,महातपुरी गट ता.गंगाखेड
1998-सभापती,महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद परभणी
7 जानेवारी 2020 ते 21 मार्च 2022 पर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षा