महायुतीचा मुख्यमंत्री ठरला…फडणवीस यांच्या नावावर…
मुंबई,दि 26 ः
विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदावरुन पेच तयार झाला. पण आता तो सुटल्याची माहिती आहे. भाजप नेतृत्त्वानं याबद्दल निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. याबद्दलची घोषणा महायुतीकडून दोन दिवसांत करण्यात येणार आहे. शिंदे मुख्यमंत्रिपदी राहण्यास उत्सुक होते. पण भाजप मुख्यमंत्रिपदाचा त्याग पुन्हा एकदा करण्यास तयार नाही. नाराज शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
राज्यात महायुतीने सव्वादोनशेचा आकडा पार केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेचे आमदार आक्रमक होते. तर दुसरीकडे एकट्या भाजपने 132 जागांवर विजय मिळवल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा संधी मिळावी यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील होते.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.
शिंदेंची नाराजी दूर करण्याचे दिल्लीतून प्रयत्न
भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यांतर मुख्यमंत्रिपद भाजपकडेच जाणार हे जवळपास निश्चित होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रयत्न केले. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर लढल्याने भाजपला एवढं मोठं यश मिळाल्याचं मत दिल्लीतील भाजप नेत्यांचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामाचा फायदा भाजपला झाला असून त्यामुळेच एकट्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याचंही भाजप नेत्यांचं मत आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिंदेंना मंत्रिमंडळातील चांगली खाती देण्यात येणार असल्याचं समजतं. यासोबतच केंद्रातही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्रिपदं आहेत. यातील १२ मंत्रिपदं शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळू शकतात. उर्वरित २१ मंत्रिपदं भाजप स्वत:कडे ठेवेल.