उलथापालथ करावीच लागणार”,आचारसंहितेपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन-मनोज जरांगे पाटील

0 253

बीड,दि 12 ः
दसऱ्यानिमित्त मनोज जरांगे पाटील यांचा श्री क्षेत्र नारायण गड, बीड येथे दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार”, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केलं आहे.

गेल्या 14 महिन्यात मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नाही. एवढा द्वेष कशासाठी? आता 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणागडावर झालेल्या भव्य दसरा मेळाव्यातून केली. जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकत आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नसल्याचा इशारा दसरा मेळाव्यातून दिला. मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून कोणतीही राजकीय घोषणा करण्याचे टाळले, पण आचारसंहितेपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यानंतर महत्वाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला आणि माझ्या समाजाला शब्द पाहिजे आणि उत्तर पाहिजे. काल 17 जाती ओबीसीमध्ये गेल्या आता तुम्हाला धक्का लागत नाही का? तुम्हीच म्हणालात. ज्या वेळी आम्ही आरक्षण मागितलं. त्यावेळी एकजण म्हणाला, महाविकास आघाडीमधून लिहून घ्या. आता मला उत्तर द्यायचं. तुम्ही 17 जाती ओबीसीमध्ये घातल्या. तुम्ही महाविकास आघाडीमधून लिहून घेतलं का? ज्यावेळी आपण मागत होतो, त्यावेळेस म्हणाले धक्का लागतो. आता एकजण बोलत नाही, धक्का लागला म्हणून.

तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहू शकत नाही

मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहागिरदाराची औलाद येऊ दे, आता झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचे नाही. कुणावर अन्याय करायचे नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करायला शिका. तुम्हाल स्वसंरक्षण करावंच लागणार आहे,असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. आमचा दोष नेमका काय आहे, ते कुणालाच सांगता येत नाही. मायबापहो लेकरं वाचवा रे, या राज्यातील समाज वाचवा. लक्षात असू द्या मायबाप हो, सोन्यासारखे लेकरं वाचवा, समाज वाचवा. माझ्या समाजातील समाजाला खाली मान घालावं लागेल असं वागू नका. स्वत:च्या लेकराची मान उंचावेल असंच आपलं पाऊल असलं पाहिजे. कोणी कुणाचं नाही. तुमचे हाल होत आहेत. तुम्हाला वेदना होत आहेत. तुमचे लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहेत. त्यांची इच्छा आहे, आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, पण आपली इच्छा आहे ते घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. आपल्याविरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला डावललं जात आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

 

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“एवढी गर्दी या मेळाव्याला होईल असं वाटलं नव्हतं. या मेळाव्याच्या चारही बाजूला माध्यमांचे कॅमेरे फिरवा, समोरच्यांचा कार्यक्रम होईल. कधी वाटलं नव्हतं की आपण एवढ्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी याल. मात्र, आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्यने आला आहात. या समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही मस्तीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळून घेण्याचं आणि साथ देण्याचं काम या समाजाने केलं. या समाजाने कधीही जातीवाद केला नाही. एवढं मोठं व्यासपीठ जर पुरत नसेल तर खरोखर तुमच्या समोर आज मला नतमस्तक व्हावं लागेल. एकदा जर तुम्ही साथ द्यायची ठरवलं तर तुम्ही पूर्णपणे साथ देता. मग तुम्ही हटत नाहीत. एकदा जर तुम्ही नाही म्हणाले तर मग साथ देतच नाहीत. आपण आज काही बोलणार नाही, मर्यादा पाळणार. जरी तुमची इच्छा असली बोलावं, पण मी आपल्या हिंदू धर्माची शिकवण आणि नारायण गडाची शिकवण पाळणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. गडाचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळतो ते दिल्लीला सुद्धा झुकवतो. याआधी ज्यांना आशीर्वाद मिळाला त्यांनी दिल्लीला झुकवले. पण ते नंतर उलटले”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणार नाही हा गडावरून शब्द देतो असं वचन जरांगे पाटील यांनी दिलं.

error: Content is protected !!