अशी होणार जिंतूर विधानसभा मतदारसंघात लढत
परभणी / प्रतिनिधी – जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झालेली आहे. तसेच वंचितनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून यावेळची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीकडून माजी आ. विजय भांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे हे निवडणूक रिंगणात राहणार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडले होते?
2019 सालच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या 3717 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 913 मते तर विजय भांबळे यांना 1 लाख 13 हजार 196 मते पडली होती. या निवडणुकीत वंचितचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 172 मते मिळाली होती.
यावेळी नेमकं काय गणित असणार?
यावेळच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या मतदारसंघात सुरेश नागरे यांनीही कंबर कसली आहे. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. सुरेश नागरे यांनी ऐनवेळी वंचितकडून उमेदवारी घेतल्याने यंदाची निवडणूक तिरंगी होवून चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.