उद्याचा दिवस ठाकरे गटासाठी महत्वपूर्ण, प्रचंड हालचाली… कारण…
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी (Thackeray Group) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण ठाकरे गटाच्या गोटात उद्या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. यातील पहिली हालचाल म्हणजे वंचित बहुजन आघाडीसोबतच्या (Vanchit Bahujan Aghadi) युतीबाबत अधिकृत घोषणा आणि दुसरी घटना म्हणजे दिल्लीतील ठाकरे गटाच्या गोटातील हालचाली.
उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी एक वाजता होणार आहे तर दुसरीकडे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही,” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
दुसरीकडे ठाकरे गट उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात आपलं लेखी म्हणणं मांडणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे ठाकरे गट उद्या निवडणूक आयोगाला प्रतिनिधी सभा आणि मुख्य नेता पदाबाबत लेखी म्हणणं पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात आता पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे. या सुनावणीत शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उद्या किंवा परवा ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं पाठवणार आहे.