तुका म्हणे : भाग १७ : क्षमा
प्रत्येक रविवारी एक शिक्षक आपल्या कॉलनीतील सर्व लहान मुलांना बोलवून कथा सांगत व त्याचा अर्थ समजावत . आजची कथा होती महात्मा फुले यांची. कथेमध्ये ते सांगू लागले, एकदा ज्योतिबा व सावित्रीबाई हे झोपेत असताना त्यांना मारण्यासाठी दोन मारेकरी आले. काहीतरी हालचाल होत आहे हे पाहून दोघांनाही जाग आली. त्यांनी पाहिले तर समोर दोन भले आडदांड मारेकरी उभे आहेत. ते ज्योतिबांना म्हणाले, आम्ही तुम्हास मारणार आहोत. त्यावर ज्योतिबा म्हणाले, मला मारून गरिबांचे शिक्षण थांबवून तुमचे भले होणार असेल तर अवश्य मारा, त्यांना काही समज देऊन, माफ करून झाल्यावर ते मारेकरी काहीच दिवसात त्यांचे निष्ठावंत सहकारी झाले. त्यातील एक मारेकरी म्हणजे धोंडीराम नामदेव कुंभार व दुसरा रोडे. पुढे तर या दोघांनी सत्यशोधक समाज बांधणीसाठी देखील महात्मा फुले यांना मदत केली. गोष्ट सांगून झाल्यावर गुरुजींनी मुलांना विचारले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी कोणते शस्त्र वापरले बरे ….मुलांना आश्चर्य झाले शस्त्र तर मारेकऱ्यांकडे होते ज्योतिबाकडे कुठे काय होते ?. बाजूलाच एका मुलाचे आजोबा बसले होते ते म्हणाले तुकाराम महाराजांनी या शस्त्राचा उल्लेख खूप छान केला आहे तो असा..
तुका म्हणे
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥
तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥
तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
म्हणजेच क्षमा हे शस्त्र ज्या मनुष्याच्या हातात आहे त्याला दुष्ट मनुष्य काय करेल ? ज्या ठिकाणी गवत नाही तेथे अग्नी पडला तरी तो अग्नी आपोआप विझुन जातो. तुकाराम महाराज म्हणतात सर्वांचे व स्वतःचे हित क्षमा करते त्यामुळे सुखाचे कारण म्हणजे क्षमा आहे ते अखंडित तुमच्याजवळ राहू द्यावे.
आपण नेहमी म्हणतो मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, मग त्यात आपण स्वतः व आपले स्व:कीय , सर्वच आले. आदिमानवापासून मनुष्यामध्ये राग, क्रोध , मत्सर , प्रेम अशा अनेक आदिम भावना तयार होत गेल्या. तसा माणूस उन्नत व प्रगत भावनेकडे वळत गेला. क्षमा ही एक प्रगत भावना..
समाजजीवनात जगत असताना आपले मतभेद , वाद – विवाद , भांडणे आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी होतच असतात व त्यातून आपले नातेसंबंध, जिव्हाळा दुरावतो व त्यातून आपण अनेक आपल्या स्वकीय, मित्रमंडळींना मुकतो. आपण प्रत्येक वेळीच क्षमा हे शस्त्र प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नसलो तरीही याचा जाणीवपूर्वक वापर केल्यास आपण अनेक ठिकाणी नातेसंबंधात पेटणारा वनवा विझवू शकतो.
क्षमा आपणास अंगीकारण्यासाठी काय करावे लागेल ?
१) प्रत्येक चुकीचा बिनशर्त स्वीकार :
आपण समाजात जगत असताना बऱ्याच वेळा आपणाकडून किंवा आपल्या स्वकीयांनीकडून चूक होत असते. काहीवेळा तर आपणास स्वतःची चूक कळतही नाही , परंतु ती इतरांना त्रासदायक ठरते. अशावेळी जेव्हाही आपणास आपली चूक झाली आहे असे कळेल त्याचा आपण बिनशर्त स्वीकार करावा ( Unconditional acceptance of mistake). कारण जोपर्यंत आपण त्या चुकीचा बिनशर्त स्वीकार करणार नाही, तोपर्यंत त्या चुकीची चिकित्सा देखील आपण मनोभावे करू शकणार नाही व आपल्या चुकीचे अट्टाहाशी समर्थन करण्यातच आपला वेळ वाया घालू. म्हणजेच चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजेच स्वतःच्या किंवा इतरांच्या चुकीचा बिनशर्त स्वीकार..
२) स्व: क्षमा – स्वतःलाही माफ करावं :
जेव्हा दुसरे चुकतात तेव्हा त्यांना माफ करण फारसा अवघड नसते. कारण पुढच्या व्यक्तीने स्वतःची चूक मान्य केली आहे आणि सॉरी म्हटलं की आपला राग लगेच वितळून जातो. परंतु चिकिस्तेअंती ज्यावेळी आपणास कळते की चूक आपली आहे, त्यावेळी आपणास माफी मागण खूप जड वाटतं. कारण सॉरी म्हणणं म्हणजे अपमानकारक , कमीपणाचे , लोक काय म्हणतील अशी आपली जाणीव असते.
जेव्हा आपली चूक स्पष्ट दिसत असते तेव्हा आपण ती स्वीकारावी. आपणही चुकू शकतो हे लक्षात घ्याव आणि स्वतःला माफ करून टाकावं, असे केले तरच दुसरेही आपल्याला माफ करतील असा विश्वास बाळगावा. आपली चूक नाकारल्याने किंवा मनाला लावून घेतल्याने त्यातून आपण राग , क्रोध अशा भावनांना स्वतः प्रज्वलित करत असतो . याचे उदाहरण म्हणजे आपल्या पुराणकथेतील रावण.. स्वतः अतिशय विद्वान, दोन्ही भाऊ स्वतःची चूक मान्य करून श्रीरामास क्षमेची मागणी करण्यास सांगत असतानादेखील , मी का क्षमा मागू? या अट्टाहासापोटी , लोक काय म्हणतील? या भीतीपोटी संपूर्ण सुवर्णनगरीची युद्धभूमी करणारा रावण..
३) इतरांना क्षमा :
आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा आपले मित्रांसोबत , नातेवाईकांसोबत वादविवाद होतात, भांडणे होतात व ते आपल्यापासून दूरावतात. ज्याचा राग आला असेल , त्याला शक्य असेल तर माफ करून टाकावं व आपलं मन साफ करावं. बऱ्याचवेळा गैरसमजातून, अनावधानाने इतरांकडून चुका होतात, आपण अशा लोकांना मी त्याची चूक माफ करूच शकनार नाही असे म्हणतो. परंतु खरं पाहिलं तर एखाद्याचा कितीही राग आला असेल तरीही आपण त्याला माफ करू शकतो हे सत्य आहे. आपण ती घटना विसरू शकणार नाही परंतु त्यास माफिने सोडून देऊ शकतो. म्हणूनच म्हणतात, you may not forget but you can certainly forgive. यासाठी हवा फक्त आपला जाणीवपूर्वक प्रयत्न..
ओशोंनी अस म्हटल आहे की जीवनातला प्रत्येक क्षण तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायचा असेल तर येणारा प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे असं समजून तुम्हीच जगलं पाहिजे. भांडण-तंटे , उणीदुणी यात वेळ घालवू नका कुणी सांगावं क्षमा करण्यासाठी असो की क्षमा मागण्यासाठी तुम्हाला पुढचा क्षण मिळणारही नाही.
म्हणूनच तुकोबाराय म्हणतात क्षमा हे जर शस्त्र आपल्या हाती असेल तर आपले कोणीही वाईट करू शकत नाही. राग , क्रोध , मत्सर या भावनाना नियंत्रणात आणण्याचे काम क्षमा करते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात
तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित ! धरा अखंडित सुखरूप !!
डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मानसोपचरतज्ज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी. ९४२२१०९२००