उष्माघात झाल्यास काय उपचार कराल?; सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

0 238

नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, 50 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया उष्माघात कशाने होतो? आणि उष्माघाताची लक्षणे, त्यावरील उपाय.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांवर गेले आहे. त्यामुळे दुपारी उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही होत आहे. एकीकडे राज्यावर अवकाळी पाऊसाचे संकट असले तरी दुसरीकडे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय यवतमाळ, धुळे येथे तापमान 39 अंशांवर होते. सध्या छत्रपती संभाजीनगरचा पारा 39 अंशांवर असून त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणा-या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असेही म्हणतात.

तर मृत्यू…

उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाहीतर मृत्यू ओढवतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. याचमुळे 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात.

उष्माघाताची लक्षणे कशी ओळखाल?

उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण. त्वचेलगतच्या रक्तवाहिन्यामधून उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वचा लालबुंद होते. त्वचेचा रंग काळपट असेल तर नखे, ओठ, आणि खालची पापणी ओढून पाहिल्यास त्वचेचा नेहमीचा रंग बदलल्याचे समजते. ओठ सुजतात. घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडते.

ही आहेत मुख्य लक्षणे

  • डिहायड्रेशन
  • चक्कर येणे
  • पुरळ येणे
  • शरीराचे तापमान 106 फॅरेनहाइटच्यावर वाढते
  • मानसिक बदल
  • मळमळ
  • अतिसार
  • घाम येणे
  • डोकेदुखी
  • फिकट त्वचा
  • हृदयाचे ठोके जलद होतात
  • पोटाच्या वेदना

अशावेळी काय करावे?

  • थंड पाण्याने आंघोळ करा.
  • भरपूर पाणी प्यावे जेणेकरुन शरीर हायड्रेटेड राहील.
  • दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.
  • घराबाहेर पडताना पूर्ण बाह्याचे कपडे आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घाला.
  • रुग्णास तातडीने सावलीत न्या.
  • ओली चादर अंगावर टाकून वारा घालणे.
  • रुग्णाच्या नाडीच्या ठोक्यावर सतत लक्ष ठेवा.
  • रुग्णाच्या मानेच्या दोन्ही बाजूंना, काखांमध्ये आणि दोन्ही मनगटांवर तसेच पायाच्या घोट्यांवर आईस बॅग्ज किंवा आईस पॅक ठेवा.
  • दुपारी 12 ते 3ः30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

कडक उन्हात घराबाहेर पडल्यावर अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी सर्वप्रथम सावलीचा आधार घ्यावा. थंड सावलीच्या ठिकाणी बसणे, डोके, मान आणि घड थंड पाण्याच्या पट्ट्यानी पुसून काढावे, असे उपाय त्वरित करावेत. यामुळे शरीराचे तापमान पूर्ववत होण्यास मदत होते. पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलाचा वापर करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.

error: Content is protected !!