पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ?, अनिल देशमुख म्हणतात- आधी धनंजय मुंडेंशी चर्चा करू..

0 40

मी भाजपची, पण भाजप पक्ष माझा नाही, पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात असे वक्तव्य केल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का? पंकजा मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा काय असणार?, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

पंकजा मुंडेंबाबत नक्की विचार करू

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी अनिल देशमुख यांना विचारला असता देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे काय बोलल्या तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या नाराजीचा विषय हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. त्याविषयी मला बोलण्याची आवश्यकता आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल.

स्थानिक नेत्यांशी चर्चा करू

अनिल देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायचा की नाही याबाबत बीड जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली जाईल. स्थानिक कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, ते ऐकून घेतले जाईल. मात्र, पंकजा मुंडेंबाबतचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच घेतील. तसेच, पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे, असे काहीही माझ्या कानावर आलेले नाही. केवळ माध्यमांमध्ये अशा चर्चा आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

अमोल कोल्हे राष्ट्रवादीतच

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने भावी खासदार म्हणून पोस्टरबाजी सुरू केली आहे. त्यामुळे खासदार शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात अमोल कोल्हे हेदेखील पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाष्य करताना अनिल देशमुख म्हणाले, अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार.

error: Content is protected !!