तुका म्हणे : चिकित्सा
एका शहरांमध्ये एक महाराज आले त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्याल्यामुळे सर्व आजार दूर होतात. हा हा म्हणता ही बातमी सर्व पंचक्रोशीमध्ये पसरली. या बातमीचे परिणाम म्हणून कोणी सांगू लागले, माझा कॅन्सर दुरुस्त झाला तर कोणी म्हणाले माझा डायबिटीस पळाला. अशा बातम्या अशिक्षितांपासून ते सुशिक्षितांपर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते व्यापाऱ्यांपर्यंत चर्चिल्या जाऊ लागल्या. रुद्राक्ष मिळवण्यासाठी धडपड चालू लागली अनेक ठिकाणी गर्दी उसळू लागली. एके दिवशी पेपरमध्ये बातमी झळकली, रुद्राक्ष मिळवण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत दोन ते तीन जणांचा मृत्यू. एक युवक ती बातमी वाचत दुसऱ्या मित्रास सांगू लागला , रुद्राक्षामुळे खरेच असाध्य आजार दूर होतात असे आमचे शेजारी सांगत होते. त्यांच्या बाजूस एक शिक्षक उभे होते ते म्हणाले, जर रुद्राक्षणे एखाद्याचा जीव वाचत असेल तर चेंगराचेंगरीत का बरे जीव जावा ? या गोष्टीची तुम्ही चिकित्सा केली आहे का किंवा असाध्य आजार नीट होण्याची प्रचिती किंवा प्रयोग तुम्ही स्वतः अनुभवला आहे का ? नसेल तर फक्त ऐकीव गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवून स्वतःची आणि पर्यायाने समाजाची फसवणूक का करीत आहात? ते पुढे म्हणाले, तुकाराम महाराजांनी केव्हाच हे सांगितले आहे. ते असे,
तुका म्हणे,
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥
तुकाराम महाराज म्हणतात, अनेक लोक म्हणत आहेत म्हणून त्या बहुमतास जाऊन मी एखादी गोष्ट मान्य करणार नाही कारण जोपर्यंत त्यामधील सत्य व असत्य याबाबत माझे मन ग्वाही देणार नाही तोपर्यंत ते मानणे चुकीचे आहे.
बहुतेक वेळा आपण एखादी गोष्ट ऐकिवात आली आणि आजूबाजूचे लोक ती गोष्ट सत्य आहे असे मानून बोलायला लागले की आपणही सत्य मानतो व त्यावर विश्वास ठेवतो. पहा ना अठराव्या दशकापर्यंत पोप सांगत होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणून गॅलिलिओने प्रयोगासहित सिद्ध केलेला सिद्धांत पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा अमान्य होता. मग असे का होते ? याचे मूळ कारण म्हणजे आपले अज्ञान व चिकित्सा न करण्याची प्रवृत्ती… चिकित्सा न केल्यामुळे दोन बाबीस वाव मिळतो त्या म्हणजे शब्द प्रामाण्यवाद आणि ग्रंथ प्रामाण्यवाद
१) शब्द प्रामाण्यवाद : एखाद्या प्रभावशाली व्यक्तीने एखादा शब्द किंवा प्रमाण सांगितले म्हणजे तेच अंतिम सत्य असे मानणे म्हणजे शब्द प्रामाण्यावाद. अशा प्रभावशाली व्यक्तीच्या वलयामुळे अनेक जण तो शब्द खरा मानायला लागतात आणि त्याची चिकित्सा न करता इतरही लोक त्यास सत्य मानून बसतात. विवेकाने विचार केल्यास कोणताही शब्द किंवा प्रमाण हे अंतिम सत्य नसते. पहा ना अगदी काही वर्षापूर्वी अभ्यासक्रमात असलेला प्लुटो हा ग्रह आता खगोलीय निरीक्षणानंतर बटुग्रह झाला आहे.
२) ग्रंथ प्रामाण्यवाद : एखादा ग्रंथ लेखकाने लिहिला व त्यातील माहिती आभ्यासल्यास कळते की, तो ग्रंथ त्या काळानुरूप, त्या परिस्थितीनुसार , त्या संस्कृतीनुसार व त्या सामाजिक अवस्थेवर अवलंबून असलेल्या माहितीवरून लिहिलेला असतो. मग त्या ग्रंथामध्ये लिहिलेली माहिती सध्याच्या काळात देखील न बदलता प्रमाण मानून तीच अंतिम सत्य मानणे योग्य कसे असेल ? मात्र बहुतेक वेळा आपण ग्रंथातील सर्व बाबी अखेरचे सत्य आहे असे मानतो व त्याची चिकित्सा करणे म्हणजे दुष्कर्म म्हणतो.
चिकित्सा का व कशी करावी ?
लहान मुलांना पाठ्यपुस्तकांमध्ये एक कविता आहे, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का ? हे पद्य आपणास चिकित्सा करण्यास सांगते. परंतु आपण आजूबाजूस पाहिल्यास कळते की आपण आपल्या मुलांना चिकित्सा करण्यास वाव देत नाही. समजा एखाद्या मुलाने विचारले रुद्राक्षाचे पाणी पिल्याने खरेच आजार बरे होतात का ? तर आपणच म्हणतो, चूप बस! शाप लागेल तुला. मग चिकित्सा यासाठीच करायची की आपली जिज्ञासूवृत्ती वाढीस लागावी, आपले अज्ञान दूर व्हावे, आपली भीती दूर व्हावी , पर्यायाने आपला विकास व्हावा व आपली – स्वकीयांची फसवणूक टाळावी.
चिकित्सा कशी करावी ? :
चिकित्सा करण्याची सुरुवात कोणत्याही गोष्टीच्या निरीक्षणातून होतो. आपण एखाद्या गोष्टीचे निरीक्षण केल्यास आपणास त्या बाबतीमध्ये अधिक माहिती मिळवायला लागतो व आपण अधिकाधिक खोलात जायला लागतो. आपणास स्वतः मिळालेली माहिती , इतरांचे अनुभव यावरून आपण त्याबाबत तर्क करू शकतो. अशा तर्कास सिद्धांतामध्ये मांडून त्याची प्रचिती आल्यास आपण त्याबाबत प्रयोग करून पाहतो. प्रयोगांती जे फलित मिळते त्यास आपण मान्य करतो. यास आपण बुद्धी प्रामाण्यवाद म्हणतो.
न्यूटनला सफरचंदाचे फळ खालीच का पडते? हा प्रश्न पडला नसता व त्याने त्याची चिकित्सा केली नसती तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागलाच नसता. जेम्स वॅट यांनी पाणी गरम करण्यास ठेवलेल्या कॅटलीवरील झाकण का उडून पडत आहे ? हा विचार केला नसता तर वाफेच्या इंजिनचा शोधच लागला नसता. जर त्यांनी हे काही भुताटकीचा प्रकार आहे असे म्हणून घाबरून सोडून दिले असते तर भीतीची अफवाच पसरली असती. त्यामुळेच चिकित्सा आवश्यक आहे.
इसवी सन अकराशे बाराशे पूर्वीचा भारताचा इतिहास पाहिल्यास कळते की भारतामध्ये विज्ञान, संस्कृती, विवेकवाद, धर्म अशा सर्व गोष्टींची चिकित्सा राजदरबारामध्ये देखील होत असे. त्यामुळेच महर्षी कणाद, महात्मा लगध, वराहमीहीर, भास्कराचार्य, आर्यभट्ट अशी अनेक वैज्ञानिकांची नावे इसवी सन बाराशे पूर्वी मिळतात. भारताच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे त्यामुळेच चिकित्सा…
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे,
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥
डॉ. जगदीश नाईक
मनोविकारतजज्ञ, मन हॉस्पिटल, परभणी
९४२२१०९२००