दुचाकी, चारचाकी गाडयांवर “स्टाईलीस्ट” नावांची व वाक्यांची वाढती क्रेझ
राजगुरूनगर, प्रभाकर जाधव –
आलं बया दाजी, तुमच्यासाठी कायपण!, नादच खुळा!, बघतोस काय मुजरा कर, भगवं वादळ ही वाक्ये आली काचेवर…
अन् राम, दादा, नाना, आण्णा, राज, पवार आदि स्थिरावले नंबरप्लेटवर….
समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय करावं ? काय करू नये ? याचा अधिकार प्रत्येकाला आपोआपच प्राप्त झाला आहे. परंतु आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाने आपल्याला सामाजिक मूल्यांची शिकवण दिली आहे. आणि त्याच समाजात वावरत असताना आपण आपल्या सोयीनुसार वागत असतो. ज्याप्रमाणे आपल्याला आपली आवड-निवड असते. त्याचप्रमाणे समाजाला अभिप्रेत असलेल्या काही आवडी-निवडी असतात. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात या समाजाला धक्का दिला जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशात अलीकडच्या काळात या स्पर्धेच्या दुनियेत वावरत असताना महाराष्ट्रासारख्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाकडे म्हणजे घरटी एक दुचाकी अथवा चारचाकी वाहन असल्यास नवल वाटत नाही. अशाप्रकारे नवीन वाहन घेताना त्या वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असावी, काचेचा रंग किती प्रमाणात काळा केलेला असावा, वाहनांवर रेडियम कोठे लावावे आदी प्रकारचे नियम वाहतूक नियंत्रण शाखेने ठरविलेले आहेत. परंतु कित्येकजण त्या नियमांना धाब्यावर बसवताना दिसत आहेत.
काही वाहनांवरील मागील बाजूवर तथा काचेवर आणि विशेषतः नंबरप्लेटवर राजकीय नेत्यांनी, सिनेकलावंतांनी, राजकीय पक्षाच्या लोगोंनी, तर काही खुमासदार वाक्यांनी कब्जा केल्याचे दिसत आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात. त्यातील काही उत्साही कार्यकर्ते आपल्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर आपल्या लाडक्या नेत्याचा फोटो लावतात. त्या फोटोखाली तसेच नंबर प्लेटवर त्या – त्या नेत्यांची टोपण नावे लिहिली जातात. नेत्यांसाठी, पक्षासाठी काहीच न करणारे अनेकजण मात्र आपणच नेत्याचे व पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असल्याचा आव आणत, तुमच्यासाठी काय पण ! असा मजकूर लिहितात. अलीकडे राजकीय पक्ष देखील भरमसाठ झाले आहेत. तर त्या – त्या पक्षाचे पुढारी सुद्धा गल्लीबोळातआहेत.
तर काही ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते पहावयास मिळतात. त्यामुळे आपल्या पक्षावर व नेत्यावर आपले खरेच खूप प्रेम व श्रद्धा असल्याचे दाखविण्यासाठी स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी गाडी शिवाय चांगला पर्याय या कार्यकर्त्यांना दिसत नाही.
तर दुसरीकडे काही अतिउत्साही तरुण सिनेमाच्या व त्यामधील कलावंतांच्या वेडापायी आपल्या वाहनांवर सिनेकलावंतांचे फोटो तसेच पोस्टर लावताना दिसत आहेत. तर काहींनी खुमासदार वाक्यांनी आपल्या गाड्या रंगवल्याचे दिसते. यामध्ये आलं बया दाजी !, तुमच्यासाठी काय पण !, नादच खुळा !,
बघतोस काय मुजरा कर, भगवं वादळ, आदि प्रकारची मराठी वाक्य लिहिलेले दिसते.
वाहनांना असणाऱ्या नंबरप्लेटचा वापर तर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून असलेल्या नंबरला व्यवस्थित आकार देऊन त्यामधून आपल्याला पाहिजे ते नाव कोरण्याचा प्रयत्न केला जातो. नव्हे तर तशा नावांसाठी नंबरच उपलब्ध करून घेतला जातो. त्यामध्ये राम, दादा, नाना, अण्णा, राज, पवार आदी नावांचा समावेश असलेले पहावयास मिळतो.
वाहनांच्या काचेवर, नंबर प्लेटवर काय असावे, काय नसावे, तसेच नंबर प्लेट कोणत्या रंगाचा असावी, त्यावर नंबर शिवाय काही लिहू नये, तसेच ती स्वच्छ व सुवाच्य अक्षरात असावी, अशा प्रकारचे वाहतूक शाखेचे शासकीय नियम असताना देखील अनेकांनी ते नियम पायदळी तुडविले आहेत. याकडे मात्र वाहतूक शाखा अत्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे.