महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वृक्षारोपणात भरीव काम – नगराध्यक्षा अंकिता शहा
पत्रकार संघाने दत्तक घेतलेल्या अगोती नं.१ गावातील १००० वृक्षांचा वाढदिवस साजरा
इंदापूर,दि 4 (प्रतिनिधी)ः
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तब्बल १४ गावात १४ हजार झाडे लावली असून, १४ गावे हिरवीगार करण्याची किमया, पत्रकार संघाच्या माध्यमातून घडली आहे. त्यामुळे वृक्षारोपणात राज्यात भरीव कामगिरी पत्रकार बंधुंनी केली आहे. असे गौरवोद्गार इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने तसेच सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या संकल्पनेतून व पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे, लावलेल्या १००० वृक्ष लागवडीचा प्रथम वाढदिवस इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, व्यापारी संघटनेचे प्रमुख नंदकुमार गुजर, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ( दि. २४ ) रोजी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा अंकिता शहा बोलत होत्या.
पुढे माहिती देताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, मानवी जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असून, हा ऑक्सिजन फक्त वृक्षापासून झाडापासून मिळू शकतो. ही महत्वाची बाब पत्रकार संघाने ओळखून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नुसते वृक्ष लागवड करून हा पत्रकार संघ थांबला नाही. तर या झाडांची जपणूक करून वृक्ष टिकवले आहेत. त्यामुळे तब्बल हजार वृक्ष लागवडीचा वाढदिवस आपण करत आहोत. सामाजिक जाणिवेतून पत्रकार संघाने कोरोना कालावधीत १३ हजार कुटुंबांना अन्नधान्य पुरवले. तर दुसरीकडे वृक्षारोपणाचा भरीव उपक्रम राबवला आहे. यामुळे शासनस्तरावरून या चांगल्या कामाची नोंद घेतली जाईल.अशी अपेक्षा नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.
यावेळी सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे, तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले, तालुका संघटक भिमराव आरडे, बाळासाहेब कवळे, मनोज साबळे, गोकुळ टांकसाळे, भिमसेन उबाळे, रोटरी क्लबचे प्रमोद भंडारी, जयश्री पवार, गावचे ग्रामसेवक निलेवाड यांच्यासह गावकरी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले.तर आभार गोकुळ टांकसाळे यांनी मानले..