आगळा सर्वगूणे – श्रीराम – मनाचे श्‍लोक (भाग 31)

0 126

महासंकटी सोडिले देव जेणें ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ।
जयातें स्मरे शैलजा शूळपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥31॥
अर्थ : हे मन ! ज्या रामाने थोर संकटातून देवांना बंधमुक्त केले असा हा श्रीराम प्रताप,बळ सर्व गुणात सर्वांहून अत्यंत श्रेष्ठ आहे. शैलजा म्हणजे शूलपाणी ची पत्नी .शूलपाणी म्हणजे ज्याच्या हाती शूल आहे तो भगवान शंकर.
पर्वतकन्या पार्वती व तिचा पती श्रीशंकर ज्या रामाचे ध्यान निरंतर करीत असतात, असा हा प्रभुश्रीराम दासांची उपेक्षा करीत नाही.
समर्थ रामदास यांनी देवी देवतांवर बरीच स्तोत्रं लिहिली. समर्थ रामदासांचे ’भीमरूपी महारुदा वज्रहनुमान मारुती’ हे त्यांचे स्तोत्र लोकपरिचीत ठरले.
संमर्थांना हनुमंताचा फार आधार वाटत होता. कारण त्यांचे वडील सूर्याजीपंत, बंधू गंगाधरपंत आणि स्वत: समर्थ या तिघांना हनुमंताचे दर्शन झाले होते. लहानपणी समर्थांना रामांनी अनुग्रह दिला आणि येथून पुढे हनुमान तुम्हाला सांभाळेल असे सांगितले. म्हणून समर्थांना हनुमंताचा खूप आधार वाटत होता. हनुमंताचे समर्थांवर खूप उपकार होते.
या उपकारांचे उतराई होण्यासाठी समर्थांनी हनुमंताची एकवीस स्तोत्रे लिहिली आहेत. या स्तोत्रांवरून असे स्पष्ट दिसते की समर्थांच्या मते हुनमान हा समाजाचा संरक्षणमंत्री आहे. एक राष्ट्रीय दैवत म्हणून समर्थ हनुमंताची प्रतिमा उभी करतात.
जेंव्हा जेंव्हा देवांवर संकटे आली तेंव्हा अवतार धारण करून प्रभुने देवांचे रक्षण केले. रामावतारामध्ये श्रीरामांनी रावणाने बंदी केलेल्या सर्व देवांची सुटका केली .रावणाने लंकेमध्ये देवांना बंदिवासात टाकले होते अन तिथे त्यांचे दिवस कसे कष्टात जात होते त्याचे वर्णन समर्थांनी केले आहे.
समीर लोटितो खडे ख वरुण घालितो सडे ख
मयंक साऊली धरी ख मलीन पावकु हरी खख
विधी विधीस धाकतो ख सुरेंद्र बाग राखतो ख
सटी आरंधळी दळी ख गणेश गाढवे वळी खख
बहु कठीण काळ हो ख समस्त पावले मोहो ख
हिनादिनाचीया परी ख सदा गळीत अंतरी खख
अशी हीन स्थिती होऊन खाली मान घालून अश्रू ढाळीत देव बसले होते. असे लाजिरवाणे आणि दु:खमय जीवन जगणार्‍या देवांची मुक्तता करण्यासाठीच प्रभूश्रीरामांचा अवतार झाला.
आगळा सर्व गुणे म्हणजे काय तर… महापराक्रमी, प्रतापी, अत्यंत शौर्यशाली एवढेच श्रीरामाचे वर्णन नाही तर सद्गुणी ,बुद्धिमान, नीतिमान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, दृढवत,चारित्र्यसंपन्न , भूतदया असणारा,विद्वान,समर्थ ,संयमी ,उत्तम वक्ता, क्षमाशील, प्रजावत्सल ,तेजस्वी , दर्शन कोणालाही प्रिय होइल असा हा सर्व गुणांचा स्वामी आहे. सर्वच उत्तम गुण श्रीरामांचे ठिकाणी एकवटलेले आहेत.असे गुण एकाच व्यक्ती मध्ये दिसणे दुर्मिळच म्हणून ’ आगळा सर्व गुणे ’
समर्थ या चारही श्‍लोकांत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगताहेत तू ज्याला पूज्य मानले आहेस तो राम आपल्या भक्तांसाठी काहीही करू शकतो . तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही .
श्रीरामांचे अनेक गुण सांगता येतील .त्यांची कर्तव्य निष्ठा कठोर होती . कैकयीला राजा दशरथाने दिलेल्या वचना प्रमाणे पितृ आज्ञा शिरसावंद्य मानून 14 वर्षे वनवास भोगण्यासाठी आनंदाने तयार झाले . बंधुप्रेम ,एकपत्नीव्रत ,एकबाणी , एकवचनी , श्रीरामांचे चरित्र , आजच्याही तरुण पिढीला आदर्श ठरणारे आहे .
ते पुत्र ,बंधू ,स्नेही ,राजा ,पती या सर्वच दृष्टीने ते पुरुषोत्तम आहेत .म्हणूनच वैराग्याचा सम्राट असणारे तपस्वी शंकर वा त्यांची पत्नी हिमालयाची कन्या पार्वती म्हणजे साक्षात ’शिव आणि शक्ती’ हे दोघेही श्रीरामांचे स्मरण करतात .
रवींद्रनाथ टागोर म्हणत, ‘ज्याला प्रकाशाची चाहूल लागते आणि पहाटेच्या काळोखात ज्याला गाणे स्फुरते असा पक्षी म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा ही सुखद आशावादाची सनई असते. तिच्या वादनाने जीवनाचे दालन उघडते.’
बुद्धिनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा यांच्या इतकाच जीवनात भावनांचाही पाझर असायला हवा. भावनाशून्य जीवन रूक्ष आणि कोरडे होईल.
म्हणुन समर्थ सांगत आहेत की…
हे मना , असा हा प्रभू श्रीराम माझा स्वामी आहे आणि तो माझी कधीच उपेक्षा करणार नाही हा विश्‍वास तू दृढ धर!

जय जय रघुवीर समर्थ
ज्योती कुलकर्णी, मुंबई

error: Content is protected !!