आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात
आळंदी,दि 08 (प्रतिनिधी)ः
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत भामा आसखेड धरणाचे पाणी कुरूळी जॅकवेलमधून आळंदीला नेण्यासाठीच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून बंदीस्त जलवाहिनीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कामास विलंब झाला नाही तर महिनाभरात काम पूर्ण होऊन आळंदी शहरातील नागरिक, भाविक व वारकरी यांना पुरेशा प्रमाणात व उच्च दाबाने शुध्द पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरसेवक तथा मा. उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी सांगितले.
चिंबळी येथे पंचवीस मीटर व केळगावमध्ये पन्नास मीटर लांबीचे काम राहिले आहे. चिंबळी येथे पद्मावती मंदीर परिसरात सुरू असलेले काम स्थानिक शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते, प्रत्यक्ष जागेवर जाऊन अडचणीच्या ठिकाणांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या तांत्रिक अडचणीचे निरसन करून संबंधीत ठेकेदारांना काम करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता धनंजय जगधने, ठेकेदार विकी जावळे, मयूर गोरे, नवनाथ आंधळे, मयूर लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळेस केळगाव व चिंबळी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. कुरूळी जॅकवेल ते आळंदी पाणीपुरवठा केंद्रापर्यंत सुमारे १५ एअर वॅाल्वचे काम देखील पूर्णत्वास आहे. येत्या सप्टेंबर महिनाअखेर पर्यंत फ्लो मीटर व जलवाहिनीचे राहिलेले काम पूर्ण करून जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती अभियंता धनंजय जगधने व विकी जावळे यांनी दिली.